जव्हार प्रतिनिधी - दिनेश आंबेकर
जव्हार : जव्हार तालुक्यातील चांभारशेत गावचे सुपुत्र सीआयएसएफ जवान कै. देवराम रावजी चौधरी यांचे ओएनजीसी मुंबई येथे कार्यरत असताना ते कर्तव्यावरून घरी आल्यावर त्यांना वीरमरण आल्याची घटना घडली. सैन्यात भरती झालेले कै. देवराम चौधरी त्यांच्या पच्छात त्यांची पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहेत.
त्यांचा आदिवासी गरीब कुटुंबात जन्म झालेला असून त्यांच्या परिवाराने व त्यांनी मोलमजुरी काबाडकष्ट करून वावर-वांगणी सारख्या दुर्गम भागात त्यांनी आपले शिक्षण घेऊन २९ मार्च १९९७ ला ते नोकरीला लागले. पहिली पोस्टिंग मुंबई त्या नंतर नागोठणे, असा विविध ठिकाणी पोस्टिंग होऊन आता ते २०१९ पासून ओएनजीसी मुंबई येथे कार्यरत होते. चांभारशेत गावातील ते पहिलेच देशसेवेसाठी जवान म्हणून नोकरीला लागले.
मनमिळावू स्वभावाने परिचित, गरिबीची जाणीव असलेले कै. देवराम चौधरी यांच्या वीरमरण आल्याची बातमी गावात पसरली आणि चांभारशेत गावासह जव्हार तालुक्यात शोककळा पसरली. त्यांच्या वरती शासकीय इतमामात सलामी देऊन त्यांना निवासस्थानी मूळगावी रविवार दि. ०६ नोव्हेंबर रोजी आणण्यात आले व रात्री १० च्या सुमारास मूळगावी जवानांनी सलामी देऊन अंत्यविधी करण्यात आला. सर्व ग्रामस्थांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.