प्रतिनिधी - दिनेश आंबेकर यांच्या कडून ..
मोखाडा - विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून पात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन तहसीलदार मयूर खेंगले यांनी केले आहे .
शिक्षक मतदार संघासाठी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने मतदार याद्या (de-novo) तयार करणे आवश्यक असल्याने पूर्वीच्या शिक्षक मतदार संघाच्या यादीमध्ये नाव असले तरी सुद्धा अशा व्यक्तीने विहित नमुन्यामध्ये नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे.
जी व्यक्ती भारताची नागरिक आहे व कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची सर्वसाधारणपणे रहिवासी आहे.तसेच जिने दिनांक 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी लगतच्या सहा वर्षांमध्ये राज्यातील एखाद्या माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये एकूण किमान तीन वर्षे अध्यापनाचे काम केले आहे,अशी व्यक्ती मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट केले जाण्यास पात्र राहील.
शिक्षक मतदार संघाच्या यादीत नाव दाखल करण्यासाठी सादर केलेल्या नमुना 19 मधील अर्जासोबत संबंधित व्यक्तीने दिनांक एक नोव्हेंबर 2022 पूर्वी लगतच्या सहा वर्षांमध्ये एखाद्या माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये एकूण किमान तीन वर्षे अध्यापनाचे काम केले असल्याबाबत शैक्षणिक संस्था प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे
एखादी व्यक्ती अर्ज दाखल केलेल्या दिनांकास अध्यापनाचे काम करीत नसेल तर त्या व्यक्तीने अखेरीस ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये काम केले असेल त्या संस्थेच्या प्रमुखांनी ते निवेदन प्रमाणित करणे आवश्यक आहे
मतदार नोंदणीचे अर्ज समक्ष अथवा टपालाने गठ्ठ्याच्या स्वरूपात प्राप्त झाल्यास मतदार नोंदणी अधिकारी यांचे कडून स्वीकारण्यात येणार नाहीत. तथापि शैक्षणिक संस्थेचे प्रमुख त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रितपणे पाठवू शकेल. एकाच कुटुंबातील सदस्य नमुना क्रमांक 19 मध्ये त्याच कुटुंबातील इतर सदस्यांचे अर्ज सादर करू शकेल.तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याची मूळ प्रमाणपत्रे सादर करून पडताळणी करून घेऊ शकेल
कोणत्याही व्यक्तीने आपल्या अर्जामध्ये जे खोटे आहे आणि जे खोटे असल्याचे माहित आहे किंवा जे खोटे असल्याबद्दल तिची खात्री झाली आहे किंवा जे खरे असल्याची तिला खात्री वाटत नाही असे एखादे निवेदन किंवा प्रतिज्ञापत्र सादर केल्यास ती व्यक्ती लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 च्या कलम 31 अन्वये शिक्षेस पात्र होईल.
पहिल्या अनुसूचिच्या स्तंभ तीन मध्ये नमूद केलेल्या मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयामधून अर्जाचा छापील नमुना क्रमांक 19 मिळवता येईल.दुसऱ्या अनुसूची मध्ये नमूद केलेल्या नमुन्याप्रमाणे असलेले हस्तलिखित,टंकलिखित, चक्रमुद्रित किंवा खाजगी छापून घेतलेले नमुने देखील स्वीकारण्यात येतील.
शिक्षक मतदार संघाच्या याद्या बनवण्याचे काम सुरू असून याबाबतचे अधिकचे अटी व शर्ती जाणून घेऊन पात्र माद्यमिक उच्च माद्यमिक शिक्षकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी.