Type Here to Get Search Results !

कॉरिडॉरसाठी एकवटले सर्वपक्षीय कार्यकर्ते! शेतकरी उद्ध्वस्त होणार नाही, हा माझा शब्द : श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर




कॉरिडॉरसाठी एकवटले सर्वपक्षीय कार्यकर्ते! शेतकरी उद्ध्वस्त होणार नाही, हा माझा शब्द : श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती सातारा जिल्ह्याचे नेते मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ( महाराजसाहेब ) यांनी औद्योगीकरणाविषयांची आपली भूमिका स्पष्टपणे मंडली हा प्रकल्प साकारताना इथला शेतकरी उद्ध्वस्त होणार नाही, हा माझा शब्द आहे. तुम्ही निश्चित माझ्या खांद्यावर मान ठेवा, असे स्पष्ट करून ते म्हणाले, "मी म्हसवडचे नुकसान करत नाही. या प्रकल्पासाठी आधीच्या राज्य सरकारने म्हसवडला प्राधान्य दिले होते. तेव्हा उत्तर कोरेगावला राज्याची एमआयडीसी, द्या असे मी त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजितदादांना सांगितले होते. आताच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, की औद्योगिक कॉरिडॉरला कोरेगावची जागा देऊ. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, की तुम्हाला म्हसवडला कॉरिडॉर करायचा असेल तर अवश्य करा; पण आम्हाला अडीच-तीन हजार एकरांची राज्याची एमआयडीसी द्या. या भागाचाही औद्योगिक विकास व्हावा, एवढेच माझे म्हणणे आहे. कॉरिडोर प्रकल्प कोरेगावात आणण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. मी नाही. हा प्रकल्प म्हसवडमध्ये योग्य नाही, असे अधिकान्यांनी सांगितले आहे. मी असे कधीच म्हटलेले नाही. माझे म्हणणे एवढेच, की हा कॉरिडॉर झाला तर जिल्ह्याचा कायापालट होईल. एक लाख बेरोजगारांना काम उपलब्ध करून देण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. प्रकल्प झालातर कोरेगावलाच होईल. त्यासाठी लोकांनी साथ दिली पाहिजे. " श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांनी या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचेही उदाहरण दिले. ते म्हणाले, "श्री. पवार नेहमी सांगतात, की एखाद्या कुटुंबात चार तरुण लोक असतील, तर सर्वांनीच शेतीत काम करू नये. एकाने शेती करावी, एकाने व्यापार करावा, कोणी नोकरी करावी, तर कोणी उद्योग करावा, तरच या कुटुंबाची प्रगती होते आणि हे खरेच आहे. प्रकल्प येणार म्हणजे, सगळी शेती जाणार, असा याचा अर्थ होत नाही, हे लक्षात घ्या. "लोकांनी प्रकल्पाविषयी मनात असलेल्या शंका-कुशंकाविषयी या वेळी श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांना मनमोकळेपणाने प्रश्न विचारले. श्रीमंत रामराजे यांनीही लोकांच्या शंकांचे निरसन केले.

पिंपोडे बुद्रुक, येथे दिनांक १८ प्रस्तावित औद्योगिक कॉरिडॉरच्या समर्थनासाठी उत्तर कोरेगावातील सर्वपक्षीय कार्यकत्यांनी काल नांदवळ येथे झालेल्या मेळाव्यात एल्गार केला. वर्षांनुवर्षे वंचित राहिलेल्या या भागात औद्योगीकरण होणार असेल, तर ते होण्यासाठी ही एकजूट आम्ही कायम ठेवू. प्रस्तावित प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर कोरेगावची जागा देण्यात येईल, असे सूचित केले असून, कोणत्याही स्थितीत हा प्रकल्प येथेच व्हावा यासाठी आमची राजकीय भूमिका बाजूला ठेवून लढा देऊ, असा निर्धार या वेळी करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, काँग्रेस, तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांतील कार्यकर्ते, पदाधिकारी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि दीपक आमदार चव्हाण या वेळी उपस्थित होते.

संपूर्ण सातारा जिल्ह्याचे आर्थिक चित्र पालटण्याची क्षमता असलेल्या बंगळूर- मुंबई औद्योगिक कॉरिडॉर म्हसवडमध्ये होणार, की उत्तर कोरेगावात हा सध्या कळीचा प्रश्न बनला आहे. हा प्रकल्प कोणत्याही स्थितीत कोरेगावातच व्हावा, याकडे लक्ष वेधण्यासाठी कॉरिडॉर समर्थक समितीच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे उत्तर कोरेगावातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते भर पावसात या मेळाव्यास हजर राहिले, वास्तविक, महाविकास आघाडीच्या सरकारने या प्रकल्पासाठी म्हसवड परिसरातील जागा प्रस्तावित केली होती. केंद्रीय समितीने त्यासाठी म्हसवड परिसरात स्थळ पाहणीही केली होती. दरम्यानच्या काळात राज्यातील सरकार बदलले आणि जुलैमध्ये या प्रकल्पाबाबत केंद्रीय उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीस उपस्थित होते. म्हसवडमधील जागा अयोग्य असल्याने या प्रकल्पासाठी उत्तर कोरेगावातील जागा देऊ, असे त्यांनी या समितीस सांगितले. ही बाब समोर आल्यानंतर प्रकल्प म्हसवडमध्ये होणार, की कोरेगावात याचा वादंग सुरू झाला. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर नांदवळ येथे झालेल्या या मेळाव्यात या भागातील सर्वपक्षीय कार्यकर्ते कॉरिडॉरसाठी एकत्रित आल्याचे चित्र पाहायला मिळाले. वास्तविक या मेळाव्याला सर्व पक्षांच्या आमदारांना आणि खासदारांना निमंत्रणे देण्यात आली होती, असे संयोजकांनी सांगितले. श्रीमंत रामराजे आणि दीपक चव्हाण हे वगळता इतर आमदार वा खासदार मेळाव्याला उपस्थित नव्हते. मात्र, त्यांच्या कार्यकत्यांनी झाडून मेळाव्याला उपस्थिती लावल्याचे चित्र दिसले. या सर्वच कार्यकत्यांनी आणि या भागातील प्रतिष्ठित ग्रामस्थांनी हा प्रकल्प होणे गरजेचे असल्याचे मत आपल्या मनोगतात व्यक्त केले.

यावेळी लालासाहेब शिंदे, अशोकराव लेंभे सतीश घुमाळ, नागेश जाधव संजय साळुखे, ललित मुळीक, संग्राम सोळसकर, सूरज यादव, मोहन सोळसकर, देवाप्पा यादव, दयाराम सोळसकर, मनोज अनपट, दीपक पिसाळ, सचिन पवार, दत्तात्रय निकम, दयाराम बापट आदी उपस्थित होते. विशाल सोळसकर, मोहन यादव, वसंत धुमाळ, अजित साळुंखे, श्याम कुलकणों, शिवाजीराव पवार, अजित भोईटे, डॉ. सुयोग लेंगे यांची भाषणे झाली. दिलीप पवार यांनी प्रस्ताविक केले. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रतापसिंह पवार यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News