पालघर :- दिनेश आंबेकर
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आयुष्यात कधीही दसऱ्याला रावण जाळल्याची नोंद नाही. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज किंवा महाराष्ट्राच्या इतिहासातील कोणत्याही महापुरुषाने रावण जाळल्याची नोंद नाही.
महाराष्ट्राचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक आदर्श आपल्यापुढे मांडून ठेवलेला आहे. अफजलखानाचा वध केल्यानंतर, कसलंही शत्रुत्व मनात न ठेवता त्याची कबर बांधली. तिथून पुढे ना त्याला पुन्हा पुन्हा जाळलं ना त्याची पुजा केली. महाराजांनी आयुष्यात घेलतेला एकेक निर्णय हा आपल्यासाठी नियम आहे! अशावेळी रावण दहन करून आपण महाराजांनी घालून दिलेल्या इतिहासाची, त्या नियमांची कुठेतरी पायमल्ली तर करत नाही ना?
एखाद्याला जाळणं ही विकृती आहे, मग तो जिवंत व्यक्ती असो, मृत व्यक्ती असो किंवा मग निर्जीव पुतळा असो. दिवसेंदिवस आपण, मराठी माणूस एका विकृतीचे पाईक होतोय याची जाणीव किमान स्वतःला झाली पाहिजे.
उत्तर भारतीय लोक आधीपासूनच कट्टर आहेत, आपल्याकडे हा रोग गेल्या काही काळापासून आला आहे. नर्मदेच्या वरच्या लोकांना काहीही करू देत कारण त्यांना अन्न, वस्त्र, निवारा यापेक्षाही देव आणि धर्मात जास्त रूची आहे. ते याच उन्मादातून वर्षानुवर्षे रावण जाळत आलेले आहेत पण महाराष्ट्रात परंपरेच्या नावाखाली ही रावण दहनाची अंधश्रद्धा आली हे आपलं दुर्दैव आहे. खरंतर महाराष्ट्रात रावण दहनाच्या नावाखाली कट्टरता रूजवली गेली हे जास्त दुर्दैव आहे!
दक्षिण भारतात काही ठिकाणी रावणाची पुजा करतात तर उत्तरेत जाळतात. महाराष्ट्र कितीतरी वर्षे या दोन्ही पासून अलिप्त होता, आताही अलिप्तच राहू. ना पुजा ना दहन... रावणाला एकटं सोडा! रावण होता की नव्हता, चांगला की वाईट हा प्रश्नच इथे येत नाही... एखाद्याला प्रतिकात्मक जाळणं ही विकृती आहे, ही विकृती किमान महाराष्ट्रात तरी नको आहे!
छत्रपती शिवाजी महाराजांनी दसरा, सीमोल्लंघन केलेले असंख्य पुरावे आहेत पण रावण दहन एकदाही केलेलं नाही. उलट मेलेल्या शत्रुचाही आदरच केलेला आहे. एका बाजूला स्वत:ला महाराजांचा मावळा म्हणून घ्यायचं आणि दुसरीकडे रावण दहनाची तळी उचलायची याला ढोंग म्हणतात... महाराष्ट्रात गेल्या काही काळात या ढोंगी तरुणांची संख्या वाढत आहे कारण जी परंपरा आपली कधी नव्हतीच ती रुजली जात आहे! खरंतर या परंपरेच्या नावाखाली एक विकृती महाराष्ट्रात दरवर्षी रूजली जात आहे!
दसरा हा सण नवीन सुरुवात करण्याचा उत्सव आहे! छत्रपती शिवाजी महाराज दरवर्षी सीमोल्लंघन करून नवीन मोहीमा हाती घ्यायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच दसऱ्याला धम्मचक्र परिवर्तन करून असंख्य दमलेल्या, पिचलेल्या जिवांना एक नवी पहाट दाखवली... या आपल्या खऱ्या परंपरा! यांचे पाईक होणं आवश्यक...ना की कोणालातरी जाळण्याच्या विकृतीचे पाईक होणं! काहीतरी नवीन सुरुवात करायचा हा दिवस.