सोयगाव, दि.२५..
जिल्ह्यात लहान मुलांना पळविणारी टोळी असल्याचा मॅसेज सोशल मीडियात व्हायरल होत असल्याने पोलिसांकडून या प्रकाराची पडताळणी करण्यात आली. अशी कुठल्याही प्रकारची टोळी सक्रीय नसून या केवळ अफवा) असल्याचे निदर्शनास आले असून यापुढे सोशल मिडीयात मॅसेज व्हायरल केल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी दिला आहे.
गेल्या पाच सहा दिवसांपासून जिल्ह्यात लहान मुले पळविणारी टोळी सक्रीय झाल्याचा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन देखील अलर्ट झाले असून त्यांनी याबाबतची संपुर्ण पडताळणी केली असता, अशा प्रकारची कुठलीही टोळी सक्रीय नसल्याचे समोर आले आहे. यापुढे जो कोणी सोशल मीडियावर अशा प्रकारचे मॅसेज व्हायरल करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल, त्याच्यावर सायबर अॅक्ट नुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी दिला आहे.
खात्री करुन पोलिसांना द्या संबंधितांची माहिती
सोशल मीडियात मुले पळविणारी घटनेची पोस्ट कुणी व्हायरल करीत असेल तर नागरिकांनी अगोदर त्या संबंधित व्यक्तीची खात्री करावी. त्यानंतर तात्काळ नजिकच्या पोलिस ठाण्यात जावून माहिती द्यावी. जेणेकरुन समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून कुठलीही अनुचित घटना घडणार नाही.सोयगाव तालुक्यात अशी कोणतीही घटना घडलेली नसून सोयगाव पोलीस अलर्ट झालेले आहे स्थानिक सोयगाव तालुक्यातील व बाहेरगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षा साठी टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून असा प्रकार आढळून आल्यास तातडीने ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सोयगाव पोलिसांनी केले आहे...