डॉ.अनिकेत देेशमुख यांच्या गावभेट दौर्यास युवकांसह ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद
सांगोला (प्रतिनिधी):- दर 6 महिन्यांमध्ये लोकांमध्ये जावून समस्या जाणून घ्यायच्या ही आबांसाहेबांची आदर्श परंपरा मी यापुढे कायम ठेवणार आहे. प्रत्येक गावातील समस्या व प्रश्नासंदर्भात कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी प्र्रयत्न करु. शेकापच्या तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेवून ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली नेहमी मी काम करत राहणार आहे.
पक्षाच्या कार्यकर्त्यांना यापुढील काळात कोणत्याही समस्या आल्यातरी आम्ही देशमुख कुटुंबिय कायम तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. भविष्यकाळात आपल्याला कोणत्याही अडचणी येणार नाही परंतु आपण सर्वांनी संघटित राहणे गरजेचे आहे. स्व.आबासाहेब आज आपल्यात नसले तरी त्यांच्या स्मृती कायम आपल्यासोबत असणार आहेत. येणार्या सर्व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटित होवून व ताकदीने सर्वांनाच काम करावे लागणार असून आबासाहेबांच्या स्मृतीना आंदराजली वाहण्यासाठी येणार्या सर्व निवडणुकीत लालबावटा संपूर्ण तालुक्यात फडकवुया ,असे मत डॉ.अनिकेत देशमुख यांनी व्यक्त केले.
शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने काल बुधवार दि.14 सप्टेंबर रोजी ह.मंगेवाडी, जुनोनी, जुजारपूर, गौडवाडी, कोळे, हातीद या गावात डॉ.अनिकेत देशमुख यांचा गावभेट दौरा संपन्न झाला. या गावभेट दौर्याप्रसंगी डॉ.अनिकेत देशमुख बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा देशमुख, प्रा.विठ्ठलराव शिंदे सर, चिटणीस दादासाहेब बाबर, अॅड.सचिन देशमुख, श्री.बाबासाहेब करांडे, श्री.बाळासाहेब काटकर, श्री.अमोल खरात, बाळकृष्ण कोकरे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, विविध गावचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह तरुण कार्यकर्ते,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले, मी शिक्षणात असल्यामुळे समक्ष जरी मी सांगोल्यात हजर नसलो तरी तालुक्यातील प्रत्येक गावातील समस्या, अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क करा मी सांगोला तालुक्यातील जनतेच्या सेवेत 24 तास हजर असणार आहे. चांगल्या कामासाठी आपण लढले पाहिजे असे माझे मत असून येणार्या जि.प. व पं.स.निवडणुकीत गट तट विसरुन एकत्र येवून काम करावे लागणार अशी अपेक्षा व्यक्त केली.
शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता जागृत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगल्या वाईट गोष्टी समजातात. त्यामुळे येणार्या सर्व निवडणुकत शेकापला यश मिळणार असून सर्वांनी एकत्र राहून निवडणुकीस सामोरे जावुया असे सांगत सांगोला तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रां.प.आणि सोसायटी निवडणुकीत ज्या पध्दतीने यश मिळाले त्यापध्तीने येणार्या सर्व निवडणुकीत आपल्याला चांगल्या पध्दतीने यश मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सध्याचा लम्पी रोग जनावरांसाठी घातक आहे. शेतकर्यांच्या घरापर्यंत लस पुरविण्याचे काम शासन करणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी शेकाप कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करावा. लसीचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्यांना झाला पाहिजे व लसीचे समांतर वाटप झाले पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेवून जास्तीत जास्त लसीकरण करुन घेऊन शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा असे आवाहनही शेवटी त्यांनी केले.