हिमायतनगर तालुक्यातील वडगांवचा ६ दिवसापासून संपर्क तुटला
परिसरातील शेती पिकासह शेती खरडून गेली
हिमायतनगर, जांबुवंत मिराशे।
गेल्या ८ दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील मौजे वडगाव ज येथील सुनातलाव ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे गेल्या ६ दिवसापासून येथील गावकऱ्यांचा संपर्क हिमायतनगरशी तुटला आहे. आता पुराचे पाणी गावात शिरल्याने येथील नागरीकाना सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळेला पुराचा वेढा पडला असून, पुरामुळे बाहेरगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या मुला मुलींचे मोठे नुकसान झाले आहे. गावात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली असताना देखील तहसील प्रशासनाने या गावाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे.
हिमायतनगर तालुक्यात गेल्या ८ दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासी पट्ट्यात असलेला गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, सवना ज, पिछोण्डी, वडगाव बसस्टोप, वडगाव ज, वडगाव तांडा, बुरकुलवाडी, खैरगाव, खैरगाव तांडा १, २ व ३, वाळकी, वाळकी तांडा, या गावांत व परिसरात सततच्या पावसामुळे येथील सुना तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे परिसरातील नाले तुडूंब भरून वाहत असून, जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत असून, या भागातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पिकसह खरडून गेल्या आहेत. वडगाव जवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने सहा दिवसापासून वडगाव ज. गावाचा हिमायतनगर शहराशी संपर्क तुटला आहे.
या सुना प्रकल्पात झाडे झुडपे वाढली असून, गाळ साचला असल्याने कैनॉल दुरुस्ती झाली नसल्याने व्यवस्थापण बिघडून पाऊस जास्त झाला की, तलाव ओव्हरफलो होऊन गावचा मार्ग बंद पडतो आहे. सुना तालावच्या सांडव्यातून येणाऱ्या पाण्यामूळ वडगाव येथून हिमायतनगर शहराकडे जाणाऱ्या नाल्याच्या पूलावरून मुसळधार पावसाचा पूर वाहू लागल्यानं गावातील नागरिकांना दळणवळणाची समस्या आणि आजारी रुग्णांना उपचारासाठी नेताना अडचण निर्माण झाली आहे. मागील काळात या पुलाच्या पुरात वाहून दोघा जणांचा बळी गेला असताना देखील प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याची खंत गावकर्यांनी व्यक्त केली आहे.
एव्हडेच नाहीतर येथील मुला मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असून, या भागातील सर्वच शेतकऱ्यांच्या जमिनी पिकासह खरडून गेल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शासनाने पुरामुळे गावकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी गावकर्यांना सुरक्षित स्थळी हलविणे आणि तातडीने येथील नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या पूर स्थितीबाबत माहिती घेण्यासाठी तहसीलदार गायकवाड यांचेशी संपर्क केला असता त्यांचा फोन नोटरीचेबल होता.