आज येवला संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत पीक कर्ज वाटपाचा आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,तहसीलदार प्रमोद हिले,तालुका उपनिबंधक प्रताप पाडवी, सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी, मुख्याधिकारी नागेंद्र मुतगेकर, कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपअभियंता उन्मेष पाटील, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हर्षल नेहेते, गटविकास अधिकारी अन्सार शेख, इवदचे कुलकर्णी, महावितरणचे श्री.जाधव, श्री. बारसे,कृषी अधिकारी यांच्यासह शेतकरी व बँकेचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मागणी नुसार राष्ट्रीयीकृत बँका तसेच जिल्हा बँकांनी लवकरात लवकर शेतकरी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बँकांना शासनाने दिलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत असलेल्या अडचणी तातडीने सोडविण्यात याव्यात. शेतकऱ्यांना बियाणे तसेच खतवाटप करतांना अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. विक्रेत्याकडून शेतकऱ्यांना बियाणे खत खरेदी करतांना कुठल्याही इतर वस्तू खरेदी करण्याची सक्ती होणार नाही याकडे लक्ष द्यावे. विक्रेता सक्ती करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा सूचना केल्या.
यावेळी तालुक्यातील पावसाचा आढावा घेऊन पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये पाणी टँकर सुरू ठेवावे तसेच अतिवृष्टी व पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी तालुक्यातील यंत्रणेने सज्ज रहावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच यावेळी शहर स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, कोरोना यासह विविध सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी कोरोना सोबत साथरोगाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात येऊन रस्त्या अभावी बसेस बंद होणार नाही तसेच शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.