सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्रातील जनतेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हा एकमेव चेहरा खरा व प्रामाणिक वाटत असुन महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त करणारा आहे, दिशा देणारा आहे, आधार देणारा आहे असंच संपुर्ण महाराष्ट्राचं मत आहे. तसेच कोविड काळात आपल्या घरातील कुटुंब प्रमुखाप्रमाणे आपल्या सर्वांना प्रेमाच्या मायेने सांभाळणारे व इथुन पुढेही महाराष्ट्रावर आलेले संकट स्वतःच्या छातीवर घेतील असा महाराष्ट्रातील सरळ, संयमी व अभ्यासू एकमेव नेता म्हणून उद्धवसाहेब ठाकरे यांची ओळख असल्याची महाराष्ट्रातील जनतेची व शिवसैनिकांची भावना आहे.
महाराष्ट्रात मराठी अस्मिता व ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी जर एकमेव कोणती संघटना असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरु झालेली, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली व शिवसेना पक्षप्रमुख व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाढवलेली व सांभाळलेली संघटना म्हणजे शिवसेना ही संघटना आहे. संस्कार व माणुसकीने ठासुन भरलेले परिपक्व असे हेच खरे हिंदुत्व आहे. शिवसेनेचे हिंदुत्व मजबूत व बुलंद आहे. त्यामुळे भाजप व बंडखोरांनी जनतेची दिशाभूल करु नये असेही फलटण तालुका शिवसेना पदाधिकारी व महिला आघाडीच्या पदाधिका-यांनी यावेळी सुनावले.
भाजप पडद्या आडुन शकुनीसारखा खेळ खेळत आहे. फक्त सत्ता आणि खुर्चीसाठी भाजपने शिवसेनेच्या घरात बंडाचं वादळ उभं केलं आहे. ज्यांना आमदार केलं, मंत्री केलं, ज्यांना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी भरभरून दिलं, त्यांनीच पक्षप्रमुखांच्या, शिवसेनेच्या, शिवसैनिकांच्या व मतदारांच्या पाठीत एकप्रकारे खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी या बंडखोरांना सुख दिलं आणि त्यांनीच पक्षप्रमुखांना दुखं दिलं हे खुप वेदनादायी कृत्य आहे. या कृतघ्नपणाच्या कृत्यामुळे फुटलेल्या, फितुर व गद्दार झालेल्या शिवसेना बंडखोरांच्या विरोधात व या बंडखोरांचा पडद्यामागचा बोलवता धनी असलेल्या भाजपच्या विरोधात महाराष्ट्र राज्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असल्याचे फलटण तालुक्यातील शिवसेना पदाधिका-यांनी यावेळी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
फलटण तालुका शिवसेना पदाधिकारी यांच्यावतीने एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कृतघ्नपणाच्या बंडखोरीबाबत व भाजपच्या कट कारस्थानाविरोधात फलटण शहरात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना पुर्णपणे समर्थन असल्याचे शिवसेना पदाधिकारी यांचेकडुन सांगण्यात आले. तसेच फलटण तालुक्यातील एकही शिवसैनिक फुटणार नाही, इथे कोणीही शिवसेनेचा गद्दार नाही. फलटण तालुक्यातील शिवसैनिक उद्धवसाहेबांबरोबरच आहे, शिवसेना आणि उद्धवसाहेबांची कोणाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. शिवसेना महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे आणि शिवसेनेसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आवश्यक आहेत. बाकी रस्त्यावरचा संघर्ष करायला निष्ठावान व कट्टर शिवसैनिक समर्थ आहे. शिवसेना अल्पावधीतच मोठी यशस्वी भरारी घेईल अशा प्रकारची खात्रीपूर्वक ग्वाही शिवसेनेच्यावतीने देण्यात आली. यावेळी शिवसेना पदाधिकारी व महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.