Type Here to Get Search Results !

पूर नियंत्रणासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या सूचना

पूर नियंत्रणासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या सूचना




आगामी पावसाळ्यात पुराचे नियोजन करताना महसूल, पोलिस, जलसंपदा यांसह सर्वच विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा, नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी आज दिल्या. संभाव्य पूर नियंत्रणासाठी केलेल्या आणि करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.




जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की, धरणाच्या जलाशयात येणारे पाणी आणि केला जाणारा विसर्ग यावर सातत्याने लक्ष ठेवून राहायला हवे. धरणातून पाणी किती सोडण्यात येणार आहे याबाबतची माहिती सतत विविध विभागांना द्यायला हवी. कमी कालावधीत जास्त पाऊस झाला आणि अचानकपणे धरणातून जास्त पाणी सोडण्याची आवश्यकता भासल्यास त्याची पुरेशी माहिती दिली जावी. पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठीचे नियोजन करुन ठेवायला हवे, असे ते म्हणाले.




वारंवार पूर येणाऱ्या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. ज्या जिल्ह्यात आंतर राज्य मुद्दे आहेत तिथे त्या त्या राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात राहावे, अशा सूचना जयंत पाटील यांनी दिल्या.




कर्नाटक जलसंपदा मंत्र्यांशी अलमट्टी धरणाबाबत चर्चा करणार

पश्चिम महाराष्ट्रातील पूर नियंत्रणात ठेवण्यासाठी अलमट्टी धरणाच्या पाण्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागते. त्या अनुषंगाने कर्नाटक राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच पूर नियंत्रणासाठी सांगली जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून पावसाचा अंदाज पाहून खबरदारीची पावले उचलली जातील, असेही त्यांनी आश्वस्त केले.

Jayant Patil - जयंत पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad