• Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा उमेदवारीसाठी संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेने पक्षप्रवेशाचं निमंत्रण दिलं होतं . परंतु शिवसेनेच्या निमंत्रणाकडे पाठ फिरवून संभाजीराजे कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत .
महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याची संभाजीराजे यांच्याकडून मागणी झाल्याची माहिती आहे . शिवसेना आणि महाविकास आघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे . आज दुपारी 12 वाजता संभाजीराजे छत्रपती यांनी अधिकृत पक्षप्रवेश करावं , त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल असा निरोप मुख्यमंत्र्यांच्या वतीनं संभाजीराजेंना देण्यात आला होता . यावर शिवसनेचे नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंसोबत फोनवरुन चर्चा केली होती . आता शिवसेनेची ही ऑफर संभाजीराजेंनी नाकारल्याची माहिती आहे .
मराठा मोर्चा समन्वयकांशी चर्चा करुन निर्णय घेणार शिवसेनेची ही ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे . मराठा मोर्चा समन्वयकांनी आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती . त्यावेळी संभाजीराजेंच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशीही मागणी त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती . राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे . संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन निवडणूक लढवावी , असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं . दरम्यान , गेल्या काही दिवसांपासून शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं .