विधान भवन येथे पुणे विभागीय खरीप हंगाम - २०२२ पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली. डाळिंब फळावरील खोड भुंगेरा नियंत्रणासाठी कृषी विभागानं विशेष प्रयत्न करावेत.
यामुळे होणारं शेतकऱ्यांचं नुकसान टाळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबत शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळावं याकडे लक्ष द्यावं. ऊस खोडवा व पाचट व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावं. या कार्यक्रमाला गती देण्यासाठी सहकार विभागानंही पुढाकार घ्यावा.
'विकेल ते पिकेल' योजनेअंतर्गत मागणी असलेल्या पिकांना प्रोत्साहन द्यावं. बीडच्या धर्तीवर पीक विमा योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात आली आहे. पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना फायद्याचा निर्णय घेण्यात येईल, यासाठी याच आठवड्यात बैठक आयोजित करण्यात येईल.
केंद्र सरकारच्या फलोत्पादन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा पूर्ण उपयोग करावा. शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे खतं, बियाणं मिळतील याची दक्षता घ्यावी, यासाठी गुणनियंत्रण पथकानं दक्ष रहावं. जिल्हा परिषदेमार्फत विविध योजना राबवताना शासनाच्या निधीचा विनियोग योग्य कारणासाठी होईल याची दक्षता घ्यावी.
शैक्षणिक सुधारांच्या कामांवर आणि उपक्रमांवर विशेष लक्ष द्यावं. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याविषयीचा आढावा घ्यावा. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा मागील वर्षीचा अखर्चित निधी वापरण्याच्या अनुमतीबाबत विचार करण्यात येईल.