Type Here to Get Search Results !

फलटण | राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर तिथीनुसार गुढीपाडव्याला वाढदिवस साजरा केला जातो

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती
मा.ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ( महाराजसाहेब ) यांचा तिथीनुसार गुढीपाडव्याला वाढदिवस साजरा केला जातो त्यानिमित्तने

एप्रिल १९४८ रोजी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा जन्म झाला. जणू ती नियतीची इच्छा होती, परिस्थितीची हाक होती. त्या हाकेला हुंकार म्हणजेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा जन्म होय, असे रयत मानते.
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आलेली मरगळ, फलटण-माण- खंडाळ्याची तहानलेली रयत, त्यांची पोटा-पाण्यासाठी दाहीदिशांनी होणारी वणवण आणि महाराष्ट्राला आदर्श, सुसंस्कृत, संयमी, नीतिमान, कुशल अशा नेतृत्वाची वाटणारी गरज. या सर्वांची सुप्त मागणी म्हणजेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा जन्म आणि राजकारणातील आगमनही! राजकारणातील दबदबा ते विधान परिषदेच्या सभापतीपदी झालेली निवड, हा त्यांच्या विद्वत्तेचा, संयमाचा, अनुभवाचा उचित सन्मानच म्हटले पाहिजे.
प्राध्यापक, प्राचार्य, नगराध्यक्ष,आमदार, मंत्रिपद ते विधान परिषद सभापतीपदा पर्यंत लीलया वाटचाल करणारे राज्याचे नेते ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर गेली ३० वर्षे महाराष्ट्रातील राजकारणावर आपला आदर्शवत,असा ठसा उमटवून राहिले आहेत. राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे फार मोठे योगदान आहे. नर्मदा बचावच्या श्रीमती मेधा पाटकर, ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, भारत पाटणकर, सिंधुताई सपकाळ अशा अनेक समाजसेवक, कार्यकर्त्यांबरोबर बैठका घेणे, त्यांची मने जिंकणे आणि समाजकारण व राजकारण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे सिद्ध करणे, श्रीमंत रामराजेंनाच शक्‍य झाले आहे. मोठमोठ्या नेत्यांमधील विसंवादाचा सूर कमी करून सुसंवाद निर्माण करण्याचे कौशल्य ना.श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर यांच्याकडेच आहे, हे अवघा महाराष्ट्र जाणतो.
विरोधकांनाही आपला वाटावा, असा हा नेता आहे. या नेत्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचा खरा पाया त्यांच्याच परंपरेत दडला आहे. हे लक्षात घेतले पाहिजे.ना.श्रीमंत रामराजेंचे विरोधकही खासगीत एक चांगला माणूस, चांगला नेता, चांगला राजा असे बोलतात. केवळ माणूस, नीतिमत्ता याच अंगाने ते मोठे आहेत, असे नव्हे तर त्यांची बुद्धी, प्रतिभा कोणत्याही समस्येकडे सर्वांगाने पाहण्याची चौफेर दृष्टी या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.
तालुक्‍यातील युवक वर्ग कामधंदा शोधत मुंबई, पुणे किंवा इतरत्र कोठे जाऊ नये, यासाठी श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर यांनी पाण्याच्या माध्यमातून फलटण, माण, खंडाळा सुजलम सुफलाम्‌ व्हावा यासाठी ध्यास घेतला. शिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीयमंत्री शरदचंद्र पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद आणि सुरवडीचे एमआयडीसी असे दोन मोठे प्रकल्प उभे केले. त्यासाठी अनेक उद्योजक, उद्योगपतींशी संधान साधले व तालुक्‍याचा चेहरामोहराच बदलला.खंडाळासारख्या कायम दुष्काळी भागातील लोक आज पाटाच्या पाण्याने ऐन उन्हाळ्यात परिसरातील हिरवळ आणि गारव्याचा अनुभव घेताना श्रीमंत रामराजेंना देवमाणूस ही उपाधी लावताना दिसतात, असा हा सर्वसामान्यांचा नेता खरा रयतेचा राजा आहे. हे मान्य करावे लागेल.
आज, राजकारणात राम राहिला नाही, असे म्हटले जाते. बहुतांशी ते खरे आहे. पण, काही वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी श्रीमंत रामराजे यांचे इंग्रजीतील प्रभावी भाषण ऐकून त्यांचा गौरव करताना म्हटले की, जर आज या कार्यक्रमाला मुले आणि उगवती पिढी असती तर ती नक्‍कीच म्हणाली असती की, भविष्यात आम्ही रामराजेंसारखे उत्तम राजकारणी बनू. कलामांच्या या उद्‌गारात महाराजांचे व्यक्‍तिमत्त्व तोलले गेले एवढेच नव्हे तर सन्मानित झाले, असे म्हणता येईल. कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा हा गौरव खचितच मोठा मानला पाहिजे.
सामान्यत: विरोधकांना कोपरखळ्या देत किंवा त्यांच्यावर टीका करीत अवास्तव बोलणारे अनेक नेते असतात. पण, श्रीमंत रामराजेंचे कुठलेही भाषण असो, अगदी एखादी ग्रामसभा असेल किंवा मोठी जाहीरसभा असेल एवढेच नव्हे तर विविध परिषदांमधील भाषण असो, सर्वच भाषणे लोक श्रोते म्हणून ऐकत असतात. एक विचारवंत राजकारणी म्हणून त्यांची भाषणे ऐकली जातात हेच यातून सांगता येईल. अर्थात, यामागे अभ्यास आणि चिंतन असते. कायद्यासारख्या अवघड विषयातून मास्टरी करणे आणि पुन्हा त्यात मास्टरी मिळविणे, हे तसे सोपे नाही. त्यासाठी अभ्यास आणि ध्यास लागतो, त्यामुळेच ते सिम्बॉयसिससारख्या नामवंत विधी महाविद्यालयामध्ये प्राध्यापकी करू शकले. या ज्ञानाच्या बळावरच श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक धुरंधर, संयमी, विद्वान, विचारवंत, आचारवंत, लोकहितदक्षी नेता दिला. सर्व पक्षीय नेते त्यांच्या या व्यक्‍तिमत्त्वाचा आदर करताना दिसतात.
श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर यांनी कृष्णा खोरे प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्यासाठी जे प्रश्‍न हाताळले ते तसे सध्याच्या काळात खरे तर हे अवघडच आहे.आज, वस्तुस्थितीही तशीच आहे. धरणे उभी करताना अगदी भूमिपूजनापासून ते बांध पूर्ण होईपर्यंत धरणग्रस्त, विस्थापितांचे योग्य पुनर्वसन करून प्रश्‍न सोडविणे आणि संबंधित दुष्काळी भागाला पाणी देणे हे एकाच वेळी करणे कठीणच. पण, श्रीमंत रामराजे यांनी आपल्या विद्वत्तेच्या व कौशल्याच्या जोरावर विकासाची गंगा कायम दुष्काळी भागात भगीरथ प्रयत्न करून पोहोचविली म्हणून त्यांना महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ, असे म्हटले जाते. केवळ राजकारणी म्हणून नव्हे तर एक सच्चा समाजकारणी म्हणून त्यांनी हे केले. खरे तर राजकारणाची मुळे समाजकारणात असतात हे प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण मानले तर श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर यांचे व्यक्‍तिमत्त्व असेच समाजकारणी आहे, असे म्हणता येईल. हे बाळकडू त्यांना श्रीमंत मालोजीराजे आणि श्रीमंत शिवाजीराजे यांच्याकडूनच मिळाले होते.
श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनानुसार शैक्षणिक क्षेत्रातही फलटण परिसरात घोडदौड चालू आहे. त्यांच्या उच्च विद्याविभूषीतता आणि शिक्षण व ज्ञानावरील प्रेमामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक तसेच कृषी, अभियांत्रिकी आणि विधी या आधुनिक तंत्रज्ञानयुक्‍त महाविद्यालयांची उभारणी झाली आहे.
फलटण तालुक्‍यातील जनता, युवा पिढी शिकून सवरून शहाणी व्हावी तसेच जातीभेदाचे निर्मूलन व्हावे. यासाठी श्रीमंत मालोजीराजे यांनी मुधोजी महाविद्यालय उभे केले. तर याच वाटेचा पाईक होऊन आपल्या लोकांना-युवकांना आधुनिकतेच्या प्रवाहात राहता यावे, जागतिकिकरणाच्या रेट्यात टिकून राहाता यावे, जगण्यास सक्षम व्हावे म्हणून श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर यांनी आधुनिक शिक्षणाच्या सोयीसुविधा विविध संस्थांच्या, ज्ञानशाखांच्या रूपात उपलब्ध करून दिल्या आहेत.
श्रीराम साखर कारखान्याची दुरावस्था पाहिल्यानंतर १५ वर्षांपूर्वी या क्षेत्रातील सर्व जाणकारांनी हा कारखाना अवसायानात काढण्याचा सल्ला दिला होता, मात्र श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब व श्रीमंत शिवजीराजे व त्यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांनी उभारलेला हा राज्यातील दुसरा सहकारी साखर कारखाना अवसायानात काढून कामगार,शेतकऱ्यांचे नुकसान होणार त्यापेक्षा कारखाना चालू राहीलातर फायदा होईल त्यावर तोडगा म्हणून जवाहर बरोबर १५ वर्षाचा करार करून जवाहरला वेळोवेळी मदत करत श्रीराम कारखाना पुन्हा रुळावर आनला त्यामुळे श्रीराम साखर कारखाना सुरू राहिला. शेतकरी, कामगार, बाजारपेठ यांचा फायदा झाला त्याकेलेल्या करारामुळे १५ वर्षात कारखान्याला बाळसे आले.
तसेच न्यू शुगर वर्क्स साखरवाडी हा कारखाना तत्कालीन व्यवस्थापनामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला होता. त्यामुळे हा कारखाना सुरू होऊ शकला नाही त्यामुळे साखरवाडी परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे तसेच साखर कारखान्यांमध्ये काम करणाया कामगारांचे प्रपंच अडचणीत आले होते. तसेच साखरवाडीची बाजारपेठ देखील ठप्प झाली होती. या पार्श्वभुमीवर श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील शेतकरी, कामगार, व व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक हे आर्थिक दृष्ट्या प्रचंड अडचणी मध्ये आले होते.यांच्या भवितव्याचा विचार करून हा कारखाना कसल्याही परिस्थितीमध्ये सुरू झाला पाहिजे व शेतकऱ्यांची कामगारांची थकीत देणी दिली पाहिजे या भावनेने एन.सी.एल.टी.या न्यायालयाच्या माध्यमातून श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला गळ घालून हा कारखाना सुरू करण्यास सांगितले यामुळे शेतकऱ्यांची व कामगारांची थकीत कोट्यावधी रुपयांची देणी देण्यास श्रीमंत रामराजे नाईक निंबाळ्कर यशस्वी झाले. केवळ थकीत देणे दिली नाहीत तर येथील श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या तब्बल १३२ कामगारांना पूर्ण वेतन वाढ देण्यास कारखाना प्रशासनाला भाग पाडले.
श्रीराम व साखरवाडी हे फलटण तालुक्यातील दोन प्रमुख साखर कारखाने आजमितीस उत्तम पद्धतीने सुरु आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर सुटलेला आहे. आगामी काळात तालुक्यात कारखानदारी वाढवण्यासाठी लवकरच अ‍ॅडिशनल एम.आय.डी.सी. तसेच उत्तर कोरेगावमध्ये देखील आशियायी महामार्गापासून अवघ्या १० किलोमीटरच्या अंतरावर एम.आय.डी.सी. उभी करण्यासाठी सुध्दा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर प्रयत्नशील आहेत.
लोकप्रतिनिधी हा लोकांतर्फे, लोकांसाठी, लोकांनीच निवडून दिलेला असतो. लोकसंस्थेचा तो अविभाज्य भाग असतो याची प्रामाणिकपणे नोंद घेऊन लोकसेवेचे व्रत म्हणून काम करीत राहिले पाहिजे. शेवटी लोकप्रतिनिधी हा लोकांच्या विश्‍वासातून निवडलेला असतो. म्हणूनच लोकमताचा विचार आणि आदर करून त्यांच्या विश्‍वासास पात्र ठरण्याचा आटोकाट प्रयत्न त्याच्याकडून झाला पाहिजे.
मतदाता हा केवळ कोणाच्यातरी नावापुढील बटण दाबणारा किंवा शिक्‍का मारणारा नसतो तर त्याला माणूस म्हणून आणि त्या संबंधित लोकसंस्थेचा किंवा राज्यसंस्थेचा अविभाज्य घटक म्हणून एक विचार असतो. स्वत:चे एक मत असते याचाही विचार त्याने केला पाहिजे. 
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना कायद्याची जाण आहे त्यामध्ये ते मास्टर आहेत एवढेच नव्हे तर लोक, लोकसंस्था, न्याय, कायदा, मानवी मूल्ये, राज्यसंस्था यांचीही प्रगल्भ जाण आहे. त्यामुळेच त्यांचा खरे लोकप्रतिनिधी असा गौरव होतो. म्हणून, कलामांसारख्या आदर्शवादी विचारवंत व थोर शास्त्रज्ञाला त्यांच्यातला बुद्धिमान आणि नीतिमान समाजकारणी-राजकारणी दिसतो आणि तसा त्यांचा गौरव होतो, असा हा आदर्श राजकारणी नेता प्राचीन ग्रीक विचारवंत प्लेटोच्या आदर्श राजा कसा असावा या विषयीच्या धारणेला पात्र ठरतो. 
आपल्याकडे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवराय, राजर्षि शाहू महाराज, श्रीमंत मालोजीराजे असे थोर विचारवंत, तत्त्ववेत्ते राजे होऊन गेले. श्रीमंत रामराजे असेच विचारवंत, तत्त्ववेत्ते राजकारणी आहेत की, ज्यांच्या मनात-विचारात सदा आपली रयत सुखी राहावी, संपन्न व्हावी, विकासाच्या दिशेने झेपावी असे असते. प्लेटोची हीच धारणा होती.
भूतपूर्व अधिपती कै. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या स्वप्नातील तालुका, जिल्हा पर्यायाने महाराष्ट्र साकार करण्याचे कार्य कै. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या आशीर्वादाने व साक्षीने आणि बंधुद्वय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची चिकित्सक अभ्यासूवृत्ती तसेच माझी जि.प.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सतत भ्रमंतीतून वाढत गेलेल्या लोक संपर्कातून सुरू केलेले राजकीय अभियान यास आज तब्बल तिन दशके झाली आहेत. स्वप्न साकार होत आहे, फळेही येत आहेत आता फक्‍त ती चाखणे बाकी आहे. हे घडले ते संयमी, कुशल मार्गदर्शन आणि नेतृत्वामुळेच अशा महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ( महाराजसाहेब ) यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad