Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन सेवानिवृत्त कुस्तीगीरांसाठी मदत आवश्यक : रामराजे नाईक निंबाळकर

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन सेवानिवृत्त कुस्तीगीरांसाठी मदत आवश्यक : विधान परिषदेचे सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर


फलटण प्रतिनिधी
उमेदीच्या काळात अंगात रग असताना करिअरकडे लक्ष न देता खेळाडू खेळतात. खेळाला वाहून घेतात. स्पर्धेत ते जिंकतात, हारतात पण नंतर उपेक्षा होते. त्यामुळे शासनाला निर्णय घ्यावा लागेल.पैलवान किंवा खेळाडूंना फक्त पदक देवून त्यांचे कौतुक करुन चालणार नाही. त्यांची प्रकृती व्यवस्थित राहिली पाहिजे. उमेदीचे पैलवान पुढे यावेत यासाठी त्यांना मानधन व पदे द्यायला हवीत. राज्यातील पैलवानांनीही कुस्ती परंपरा जपावी, असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
सातार्‍यातील श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषद व जिल्हा तालीम संघाच्यावतीने आयोजित 64 वी वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी राज्याचे सहकारमंत्री व पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी साहेबराव पवार, सातारा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, विवेक जाधव, दिपक पवार, सुधीर पवार, पै. बापूराव लोखंडे, काकासाहेब पवार, धनाजी फडतरे, माणिक पवार, विकास गुंडगे, संदीप मांडवे, दादासाहेब थोरात आदि उपस्थित होते.
ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, जिल्हा तालीम संघाला अनेकांनी सहकार्य केले. मात्र ही मदत केवळ शिकणार्‍या किंवा कुस्ती खेळणार्‍या पैलवानांना करुन चालणार नाही. उमेदीच्या काळात अंगात रग असताना करिअर न बघता कुस्ती, क्रिकेट, कबड्डी असे खेळ खेळाडू खेळतात. खेळाला वाहून घेतात जिंकतो किंवा हारतो पण नंतर उपेक्षा होते. त्यामुळे शासनाला निर्णय घ्यावा लागेल.
पैलवानांनी, खेळाडूंना पदक देवून त्यांनी केलेल्या कामांचे फक्त कौतुक करुन जमणार नाही. त्यांची प्रकृती व्यवस्थित राहिली पाहिजे. उमेदीचे पैलवान पुढे येतील त्यावेळी त्यांना मानधन, पद द्यायला हवे. यासाठी सहकारमंत्र्यांनी, राज्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. राज्यातील पैलवानांनी कुस्ती परंपरा जपावी. जिल्ह्याचे आणि कुस्तीगिर परिषदेच्या उपाध्यक्षांचे जवळचे नाते असल्याचेही ना. श्रीमंत रामराजे यांनी सांगितले.
ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या नाहीत. सातार्‍यात या स्पर्धा व्हाव्यात यासाठी तालीम संघाचा आग्रह होता. सातार्‍यातील मल्लांनी राष्ट्रीय पातळीवर कामगिरी केली आहे. कुस्ती सरावासाठी अनेक मल्ल दिल्लीला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये उत्तर भारतातील दिल्ली आणि महाराष्ट्रातील मल्लांचा समावेश असतो. कोल्हापूर व सातार्‍यात तालमी असतानाही काहीजण दिल्ली परिसरात कुस्ती सरावासाठी जातात. जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. याचा अभिमान आहे. अजित पवार पालकमंत्री असताना या क्रीडा संकुलाचा विकास करण्यात आला. स्पर्धक, प्रशिक्षक, पंच यांच्यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात करण्यात आली आहे. 

जिल्हाधिकार्‍यांनी या स्पर्धेसाठी चांगली तयारी केली असल्याचे सांगितले.

ना. शंभूराज देसाई म्हणाले, कुस्तीने सातार्‍याचा नावलौकिक वाढला आहे. ऑलंपिक विजेते खाशाबा जाधव यांचे स्मारक मंजूर झाले. स्व. बाळासाहेब देसाई यांनी त्यावेळी जिल्हा तालीम संघाला जागा व इमारत दिली. तालीम संघाच्या सध्याच्या कामाला नियोजनमधून निधी देण्यात आला आहे. पैलवानांनी कुस्तीच्या माध्यमातून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा. क्रीडा संकुलाच्या भाडे थकबाकीसंदर्भात मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. कुस्ती क्षेत्रात कोल्हापूरप्रमाणे सातार्‍याचेही नाव होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
बाळासाहेब लांडगे म्हणाले, खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीगिर परिषद चालते. राज्य संघटनेच्या मागणीनंतर राज्य शासनाने नोकरीत 10 टक्के जागा राखीव ठेवल्या. हिंद केसरी व इतर स्पर्धेतील विजयी पैलवानांची पेन्शन योजना सध्या बंद आहे. शासनाने परिषदेला ताकद द्यावी. गोरगरीबांच्या या खेळातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्तीगिर निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
साहेबराव पवार म्हणाले, राज्यातील तालमी लयाला गेल्या आहेत. स्व. बाळासाहेब देसाई यांनी जिल्हा तालीम संघाला साडेतीन एकर जागा दिली. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना पाठिबा दिला. ऊर्जितावस्था न आल्यास तालमींमध्ये मुले राहणार नाहीत. जिल्हा तालमीतील मुले विविध क्षेत्रात काम करत आहेत. अनेक दशके पाठपुरावा करुनही जिल्हा तालीम संघाला प्रशिक्षक मिळाला नाही. याची शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, उद्घाटन कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते आखाड्यांवर कुस्त्या सुरु करण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News