Type Here to Get Search Results !

कोल्हापूर | आजची ही सभा ऐतिहासिक स्वरुपाची अशी सभा - शरद पवार

आजची ही सभा ऐतिहासिक स्वरुपाची अशी सभा आहे. जवळपास गेले वर्षभर अनेक संकटे असताना सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, तालुक्यामध्ये जाऊन प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी युवक, विद्यार्थी, महिला, युवती या सर्व घटकांना, विभागांना घेऊन प्रचंड दौरा केला. कार्यकर्त्यांशी, लोकांशी संवाद सांधला. लोकांचे प्रश्न जाणून घेतले, राज्य सरकारमार्फत त्या प्रश्नांवर काम केले. आज त्यांच्या या मोहिमेची सांगता शाहूनगरीत होत आहे. जयंतराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अभिनंदन करुन त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी ही संकल्पना यशस्वी केली.



एका संघर्षाच्या काळातून आपण जात आहोत. आज आपल्यासमोर हा देश एकसंध ठेवण्याचे आव्हान आहे. २०१४ पर्यंत देशाची स्थिती वेगळी होती. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही एकत्रितपणे कष्ट घेतले. अनेक क्षेत्रामध्ये देशाची प्रगती व्हावी याची खबरदारी घेतली. मात्र २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपच्या हातात सत्ता आली. लोकांचा हा कौल आम्ही अंतःकरणापासून स्वीकारला. मात्र सत्ता आल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग सामान्य माणसामध्ये एकवाक्यता कशी राहील, हा देश एकसंध कसा राहील, लोकांचे दुखणे कसे कमे होईल, याची जबाबदारी राष्ट्रप्रमुखांची असते. पण आज चित्र वेगळे दिसत आहे.
मागच्या काही दिवसात आपण पाहिले तर दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात हल्ले झाले, जाळपोळ झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असले तरी दिल्लीचे गृहखाते त्यांच्या हातात नाही. दिल्लीची कायदा व सुव्यवस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हातात आहे. अशावेळी तेथील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची होती, पण त्यांनी ही काळजी घेतली नाही. दिल्लीत एखादी घटना घडली तरी त्याचा संदेश जगामध्ये जातो आणि या देशात अस्थिरता आहे, अशाप्रकारची भावना निर्माण होते. तुमच्या हातात सत्ता असून तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नाही.
दोन दिवसांपूर्वी मी कर्नाटकात होतो. त्यावेळी तेथील कार्यकर्त्यांनी सांगितले की, हुबळीसारख्या ठिकाणी जातीय दंगली झाल्या. आज कर्नाटकमध्ये अल्पसंख्याक समाजाविरोधात जाहीर फलक लावले गेले आहेत. अमुक एका गावात अल्पसंख्याकांच्या दुकानात कुणी जाऊ नये, त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊ नये, असे जाहीर फलक लावले जात आहेत. हा संदेश देणारे लोक सत्ताधारी भाजपचे आहेत. जिथे जिथे भाजपच्या हातात सत्ता आहे, तिथे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक प्रकारची आव्हानात्मक परिस्थिती आपल्यासमोर आहे.
मी कोल्हापूरच्या जनतेला धन्यवाद देऊ इच्छितो. देश अडचणीत जात असताना येथील जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने विजयी केले. मी अंतःकरणापासून तुमचे अभिनंदन करतो. राष्ट्रवादीच्या येथील सर्व नेत्यांनी उत्तम कामगिरी करुन आघाडीचा धर्म पाळला. श्रीयुत हसन मुश्रीफ यांनाही मी धन्यवाद देतो.
काश्मीरवर कुणीतरी एक सिनेमा काढला. काश्मीरमधील पंडितांवर अन्याय होऊन त्यांना इतर ठिकाणी स्थलांतरीत केले गेले, असे त्यात दाखविण्यात आले. या चित्रपटाच्या माध्यमातून जातीय संघर्ष वाढवून त्याद्वारे मतांचा जोगवा मागण्याचे काम भाजपने केले. पण वस्तूस्थिती वेगळी आहे. ही घटना काश्मीरमध्ये झाली, तेव्हा केंद्रात भाजपच्या पाठिंब्याचे व्ही. पी. सिंह यांचे सरकार होते. देशाचा गृहमंत्री भाजपच्या पाठिंब्यावर होता. काश्मीरमध्ये असलेले राज्य भाजपच्या पाठिंब्यावर होते. म्हणून देशाची, राज्याची सत्ता त्यांच्याकडे असताना जे घडले त्याचा गैरप्रचार संबंध देशात करुन देशातील माणसांमध्ये दुरावा वाढविण्याचे काम या माध्यमातून केले गेले. पण कोल्हापूरची जनता समंजस आणि शहाणी आहे. त्यांनी या प्रचाराला किंमत दिली नाही.
कोल्हापूरचे एक नेते आहेत चंद्रकांत पाटील. त्यांनी पोटनिवडणुकीत पराभव झाला तर हिमालयात जाईन, असे सांगितले होते. पण कोल्हापूरकर हुशार आहेत. तुम्ही अतिशय चांगला निकाल लावला. हा निकाल कोल्हापूरपुरता मर्यादीत नव्हता. हा निकाल संबंध देशभर गेला.
देशाची सत्ता ज्यांच्याकडे असते, त्यांनी संबंध देशाचा विचार करायचा असतो. कधी कधी मला गंमत वाटते. भारतात जगभरातील आंतरराष्ट्रीय नेते आले आहेत. पूर्वीच्या काळात आंतरराष्ट्रीय नेते आल्यानंतर दिल्लीत, मुंबईत त्यांच्या दौऱ्याची व्यवस्था केली जात असे. पण अलीकडे परदेशातले नेते येतात आणि गुजरातमध्ये जातात. ट्रम्प, जिनपिंग यांच्यानंतर काल-परवा इंग्लंडचे प्रधानमंत्री गुजरातमध्ये गेले. गुजरातमध्ये गेले म्हणून आमची काही तक्रार नाही, पण आंतरराष्ट्रीय नेते देशातील इतर भागातही गेले पाहीजेत. देशाची सत्ता ज्यांच्याकडे आहे, त्यांनी देशातील सर्व प्रांतांकडे लक्ष दिले पाहीजे. जागतिक नेते एकाच भागात पाठवायचे काम केंद्र सरकार करत असेल तर त्यांच्या मनातील भावना स्पष्ट दिसते. हा संकुचित विचार देशाच्या हिताचा नाही.
अलीकडच्या काळात अनेक गोष्टी सुरु झाल्या. सत्ता येते आणि सत्ते जाते सुद्धा. सत्ता मिळाल्यानंतर पाय जमिनीवर ठेवावे लागतात. सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नसते. सत्तेचा गैरवापर करायचा नसतो. काही वर्षांपूर्वी या देशात ईडीचे नाव कुणाला माहीत नव्हते. पण आज ईडी, सीबीआय, आयटीचा गैरवापर सुरु असून त्याद्वारे विरोधकांना नामोहरम करण्याचे काम सुरु आहे. जे लोकप्रतिनिधी सन्मानाने काम करत आहेत, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय.
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सहकाऱ्यांना तुरुंगात टाकले आहे. अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींचा घोटाळा असल्याचे सांगितले. चौकशीनंतर आरोपपत्रात बदल करुन चार कोटींचा घोटाळा सांगितले. पुन्हा आरोपपत्रात बदल करुन एक कोटी चार लाखांचा घोटाळा असल्याचे बोलत आहेत. म्हणजे शंभरवरुन एक कोटीवर आले. एक पोलिस अधिकारी चुकीचे काम करत होता त्याची चूक लक्षात आणून दिली म्हणून देशमुखांना तुरुंगात टाकण्याचे काम केले.
नवाब मलिक यांच्याबाबतही असाच प्रकार केला. वीस वर्षांपूर्वी एक जागा घेतली. वीस वर्षात ही जागा दिसली नाही. त्या जागेचा वाद आता उकरून काढत त्यांना तुरुंगात टाकले. ईडी, सीबीआय आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज दाबू शकतो, असा विचार जर ते करत असतील तर ते मुर्खांच्या नंदनवनात आहेत. राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता अशाप्रकारची कितीही संकटे आली तरी त्याचा मजबुतीने सामना करु शकतो.
असे विपरीत चित्र ज्यावेळी दिसते तेव्हा देशातील सर्व लोकशाहीवादी विचारांच्या शक्तींनी याचा विचार करण्याची गरज असते. तरीही काही संघटना आणि पक्ष वेगळा विचार करत आहेत. त्यांनी टीका टिप्पणी करावी. पण वस्तूस्थिती एक आणि टीका दुसरी करु नये. माझ्यावर आरोप केला की, मी फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव का घेतो? मी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव माझ्या, तुमच्या अंतःकरणात कोरलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक आगळावेगळा राजा आपल्या राज्यात होऊन गेला. ज्यावेळी महाराष्ट्रात मोघलांचे राज्य, आदिलशाहीचे राज्य होते, तेव्हा अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करुन राज्य प्रस्थापित करण्याचे ऐतिहासिक काम कुणी केले असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केले.
देशात आणि राज्यात अनेकांचे राज्य होऊन गेले. पण तुम्हाला आज विचारले की कुणाची राजवट तुम्हाला लक्षात येते, तेव्हा आपल्या ओठांवर एकच नाव येते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज... छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे भोसल्यांचे राज्य नव्हते तर ते रयतेचे राज्य होते. छत्रपती शिवरायांप्रमाणेच फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेताना आम्हाला अभिमान वाटतो. ज्यांना फुले-शाहू-आंबडेकरांचे नाव का घेता? असा प्रश्न पडतो, त्यांना महाराष्ट्र समजला नाही, एवढेच बोलू शकतो.
आज परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने आपण येथे जमलो आहोत. हा संवाद येथे थांबवायचा नाही तर इथून पुढेही सुरु ठेवायचा आहे. आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्या सांप्रदायिक विचाराला खड्यासारखे बाजूला करायचे आहे. देशाला एकसंध ठेवायचे आहे. नव्या पिढीची बेरोजगारी घालवायची आहे. महागाईच्या संकटातून सामान्य माणसाला बाहेर काढायचे आहे. कष्टकरी शेतकऱ्याला सन्मानाने जगवायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे काम एक जबाबदारी म्हणून शीरावर घेतले आहे. त्याला तुमची साथ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad