कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाला मिळणार गती
कल्याण-मुरबाड रेल्वे संदर्भात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम म्हणून या प्रकल्पपूर्तीसाठी आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.
कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी कपिल पाटील यांनी लोकसभेत सर्वप्रथम प्रश्न मांडला होता. त्यावर तत्कालीन रेल्वेमंत्री पियूष गोयल जी यांनी या प्रकल्पाकरिता मंजुरी दिली होती. परंतु केंद्र सरकारच्या कोणत्याही प्रकल्पासाठी ५० टक्के निधी सहाय्य व जमीन अधिग्रहण राज्य सरकारकडून आवश्यक असल्याने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे सतत राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होते. राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हा प्रकल्प लांबणीवर पडला होता. यासंदर्भात केंद्र शासनाकडून राज्य सरकारला ३ वेळा स्मरणपत्र देखील पाठवण्यात आले आहे.
दिनांक १६ फेब्रुवारी, २०२२ रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्याचे आश्र्वासित केले. अजित पवार यांनी राज्याचे बजेट सादर करताना कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी ५० टक्के निधी देण्याचे विचाराधीन असल्याचा उल्लेख केला.
राज्य सरकारचे ५० टक्के निधी देण्याकरिता मान्यता देणारे पत्र प्राप्त झाल्यावर केंद्र शासनाच्या अर्थ विभागाची मान्यता घेऊन रेल्वे विभागाकडून निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागेल.