Type Here to Get Search Results !

मोखाडा | तालुक्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी शिवक्रांती संघटनेचा आंदोलनाचा इशारा

मोखाडा तालुक्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी शिवक्रांती संघटनेचा आंदोलनाचा इशारा : दि. २८ मार्च २०२२ पासुन आमरण उपोषणास बसणार : चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी




पालघर जिल्हा प्रतिनिधी शरद पाटील वाडा मोखाडा
मोखाडा तालुक्यामध्ये विकासकामे न करताच बोगस बिलं काढण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तालुक्याच्या विकासासाठी येणारा निधी ठेकेदार व अधिकारी संगनमताने हडप करतात. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही तालुक्यामध्ये विकास झालेला नाही. अनेक खेडी व पाडे हे विकासापासून वंचित आहेत. शासनाने विकासासाठी दिलेला निधी नेमका गेला कुठे ? याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) नेमणूक करावी २०१२ ते २०२२ या १० वर्षांमध्ये खर्च झालेल्या निधीची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशीही मागणी शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष शरद यशवंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन केली आहे.



    मोखाडा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी यासाठी १३ मागण्यांचे निवेदन त्यांनी संबंधीत यंत्रणांना दिले असून दि. २८ मार्च २०२२ पर्यंत या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर त्याच दिवसापासून शिवक्रांती संघटनेचे कार्यकर्ते मोखाडा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील, असा इशारा शरद पाटील यांनी आपल्या निवेदनामध्ये दिला आहे.


     मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनामध्ये मोखाडा तालुक्यातील पोशेरा-बलद्याचापाडा (MDR-20), मोखाडा-विहिगाव (SH-78) व चास- हातेरी (MDR-18) या रस्त्यांवर झालेल्या खर्चाची माहिती देऊन या तीनच रस्त्यांवर गेल्या तीन वर्षात ४० कोटींची बोगस बिल काढल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ज्या बलद्याचापाडा या नावाने कोट्यावधी रुपयांची बोगस बिलं निघाली त्या बलद्याचापाडा या गावामध्ये आजही कच्चा रस्ता आहे. त्यामुळे या तिन्ही रस्त्यांवर झालेल्या खर्चाची चौकशी करावी, अशीही मागणी केली आहे.



     सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते भ्रष्टाचाराबरोबरच प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करुन ओशविरा, वाशाळा, खोडाळा, देवबांध, सुर्यमाळ, वाॅलब्रिज परिसर, पाथर्डी, आडोशी व विहीगांव या ९ ठिकाणी झालेल्या कामांची चौकशी करावी. या कामांमध्ये ५ कोटींपेक्षा जास्त रक्कमेची खोटी बिले निघाली असल्याचा आरोपही निवेदनामध्ये केला आहे.

     मोखाडा सा. बां. विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. दरवर्षी कामे न‌ करताच कोट्यावधी रुपयांची बिलं काढली जात आहेत. माहितीच्या अधिकारामध्ये कुणालाही माहिती दिली जात नाही. शाखा अभियंता व उपअभियंता हेच ठेकेदारांचे पार्टनर बनुन ठेकेदारी करतात त्यामुळे शासनाच्या विकास निधीचा अपहार होतो. एकाच रस्त्यावर पुन्हा-पुन्हा बोगस बिलं काढली गेली आहेत. जिथे पुल वा मोऱ्या नाहीत तिथे ते पूल व मोऱ्या दुरुस्ती केल्याचे दाखवून बोगस बिल काढली आहेत. अंदाजपत्रके चुकीच्या पद्धतीने बनवली जातात. एकूण कारभार हा संशयास्पद व भ्रष्ट आहे. म्हणूनच मोखाडा सा. बां. विभागामध्ये २०१२ ते २०२२ या १० वर्षात झालेल्या सर्व विकास कामांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी अशी मागणी शरद पाटील यांनी निवेदनामध्ये केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad