जिल्हा परिषद व मुरबाड पंचायत समितीच्या माध्यमातून महाआरोग्य शिबीर संपन्न
शेकडो नागरिकांनी घेतला महाआरोग्य शिबीराचा लाभ
मुरबाड दि. ३० (प्रतिनिधी) : लक्ष्मण पवार
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून मुरबाड येथे आज भरविण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी पंचायत समितीच्या सभापती स्वरा चौधरी, जिल्हा परिषदेच्या सदस्या रेखाताई कंटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे, अनिल देसले, मोहन भावार्थे, किसन विशे, गटविकास अधिकारी रमेश अवचार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती बोटे यांची उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील रुग्णांना अनेक वेळा तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करण्यासाठी महाआरोग्य शिबीर भरविण्यात आले होते. या शिबिरात त्वचा रोग तज्ज्ञ, बाल रोग तज्ज्ञ, नेत्र चिकित्सा तज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, कर्करोग तज्ज्ञ, दंतशल्य चिकित्सक आदींची उपस्थिती होती. तज्ज्ञ डॉक्टरांकडून ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांच्या आरोग्यविषयक शंकांचेही डॉक्टरांकडून समाधान करण्यात आले
शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न : सुभाष पवार
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार तालुक्यात विकासकामे सुरू असतानाच महाआरोग्य शिबीर भरविण्यात आले होते. या शिबिरात गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर पुढील उपचार केले जातील, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितले.