शेतीतील नाविण्यपुर्ण प्रयोग नव्या पिढीसाठी ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन
जयसिंगपूर कोरोनाच्या काळात साऱ्या जगाचे अर्थचक्र थांबले . विविध क्षेत्राच्या अर्थव्यवस्था रसातळाला गेल्या . मात्र , आमचा बहाद्दर शेतकरी अजिबात थांबला नाही . तो कोरोनायोध्दा बनुन सतत कार्यरत राहिला . त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या संकटातून सावरली . नोटाबंदी , महापूर , अतिवृष्टी आणि कोरोना अशा संकटांची मालिकाच चालू राहिल्याने आज शेतकरी अनेक आव्हानांना तोंड देत आहे . अशा वेळी काही प्रयोगशील शेतकरी करीत असलेले नाविण्यपुर्ण प्रयोग नव्या पिढीसाठी मोठा ऊर्जा स्त्रोत आहे . आणि तो सांभाळण्याचे ते लोकांपर्यंत नेण्याचे काम शेतीप्रगती मासिक गेली १७ वर्षे अखंडपणे , उत्तमपणे करीत आहे .
ही शेतकऱ्यांसाठी फार मोठी उपलब्धी आहे , असे गौरवोद्गार राज्याचे आरोग्य राज्यमंत्री नाम . राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले . ते धर्मनगर ( निमशिरगाव ) येथे शेतीप्रगती मासिकाच्या १७ व्या वर्धापन समारंभात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते . अध्यक्षस्थानी यंदाच्या कृषिरत्न पुरस्कार विजेते डा . संजीवदादा माने होते , नाम यड्रावकर यांनी आजच्या शेतीसमोरच्या अनेक समस्यांचा आढावा घेत महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली . ते म्हणाले , विविध पिकांसाठी मार्केटींगची व्यवस्था आणि शिरोळ , हातकणंगले , वाळवा , मिरज तालुक्यातील क्षारपीडित जमीन विकासाच्या कामासाठी शासन करीत असलेल्या मदतीच माहिती दिली .
तसेच नाबार्ड केडीसीसीच्यावतीने यासाठी अनेक उपक्रम आम्ही हाती घेत आहोत , असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले . व्यासपीठावर कृषिरत्न संजीव माने , राज्याचे कृषि विक्सतार संचालक विकास पाटील , नेटाफिम इरेगशनचे सहाय्याक सरव्यवस्थापक अरुण देशमुख ज्येष्ट कृषी शास्त्रज्ञ डा . बाळकृष्ण जमदग्नी , ज्येष्ठ कुस्ती समालोचक पै . शंकरराव पुजारी , प्रा . अरूण मराठे , डा . नितीन बाबर आणि शेतीप्रगतीचे संपादक रावसाहेब पुजारी होते . यावेळी पै . पुजारी यांचा अमृतमहोत्सवानिमित्त राज्यमंत्री यड्रावकर , विकास पाटील , संजीव माने यांचा सन्मापत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला . शेतीप्रगतीसाठी लेखन सहयोग देणाऱ्या १४ लेखकांचा तसेच सन २०२१ मधील ११ व २०२२ मधील १० शेतकऱ्यांना शेतीप्रगती कृषीभूषण पुरस्काराने सपत्नीक सन्मानित करण्यात आले . तर शेतीप्रगती मासिकाच्या वर्धापनानिमित काढलेल्या कृषी आयडाल्स विशेषांकाचे तसेच भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा ( पै . शंकरराव पुजारी ) ची दुसरी आवृती , चिपळूणकर कृषी तंत्रज्ञान , ( प्रताप र . चिपळूणकर ) , व्यापारी गूळ उत्पादन ( प्रा . अरूण मराठे ) अर्थप्रवाह ( प्रा . डा . नितीन बाबर ) आणि झुलाजी बी.एस्सी भाग च्या टेक्स्टबुकचे ( प्राचार्य डा व्ही , व्ही आजगेकर , किशोर आदाटे , लक्ष्मण लुबाळ , प्रा . देशमुख ) या पुस्तकांचे प्रकाशन नाम . राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाले . यावेळी प्रा . अरुण मराठे , पै . शंकरराव पुजारी तसेच विकास देशमुख , विकास पाटील , डा . बाळकृष्ण जमदग्नी आदिंनी मार्गदर्शन केले . प्रारंभी डा . अहिल्यादेवी पुजारी यांनी स्वागत व आभार मानले . संपादक रावसाहेब पुजारी यांनी प्रास्ताविक केले . यावेळी कोल्हापूर , सांगली , सातारा , सोलापूर , रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक शेतकरी उपस्थित होते . तसेच शेती , सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते . हा कार्यक्रम नेटाफिम , आरसीएफ , गोकुळ आणि विजय कृषी सेवा केंद्रांनी प्रायोजित केला होता .