Type Here to Get Search Results !

भाग्यश्री पाटील सर्व स्त्रियांच्या प्रेरणास्त्रोत : हेमा मालिनी | डॉ. भाग्यश्रीताईंच्या नृत्यामधून उत्कट, विराट आणि प्राकृतिक स्त्रीत्वाचा आविष्कार

भाग्यश्री पाटील सर्व स्त्रियांच्या प्रेरणास्त्रोत : हेमा मालिनी
 डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांचा सत्कार हेमा मालिनी यांच्या हस्ते करण्यात आला. छायाचित्रात प्रतिभाताई पाटील, डॉ. डी.वाय. पाटील, शांतादेवी पाटील, सतेज पाटील, डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. पी.डी. पाटील, डॉ. संजय पाटील, दीपक मजुमदार, डॉ. सोमनाथ पाटील-डॉ. रोहिणी पाटील, डॉ. यशराज पाटील-यशश्री पाटील, डॉ. स्मिता व डॉ. योगेश जाधव.

डॉ. भाग्यश्रीताईंच्या नृत्यामधून उत्कट, विराट आणि प्राकृतिक स्त्रीत्वाचा आविष्कार

पिंपरी, पुणेः "नृत्य हे भक्तीचे सर्वोच्च माध्यम आहे. नृत्यकलेत कलाकाराच्या केवळ शारीरिक नव्हे तर बौद्धिक कौशल्यांचाही कस लागतो. डॉ. भाग्यश्री यांच्या भरतनाट्य-अरंगेत्रमचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्यापासून प्रेरणा घेत भरतनाट्य शिकल्याचे त्या म्हणत असल्या तरी पाच-सहा वर्षांच्या अल्प काळात ही अत्यंत कठीण कला शिकून सादर केली. अशक्य ते शक्य केले. आता त्या माझ्याच नव्हे तर सर्वच स्त्रियांच्या प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत", असे गौरवोद्गार जगप्रसिद्ध भरतनाट्य नृत्यांगना, सिने अभिनेत्री, खासदार हेमा मालिनी यांनी रविवारी येथे काढले.     
       डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांनी सादर केलेल्या           भरतनाट्यम ‘श्रीम’ कार्यक्रमातील एक मुद्रा.

डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू तसेच पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ व युनिटेक सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांनी सादर केलेल्या ‘श्रीम’ या भरतनाट्य-अरंगेत्रम कार्यक्रमात हेमा मालिनी बोलत होत्या. करोनामुळे नव्याने आलेल्या निर्बंधांमुळे निवडक रसिकांपुढे हा कार्यक्रम सादर करावा लागला. मात्र, ही सायंकाळ अविस्मरणीय ठरली.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, भाग्यश्रीताईंचे वडील - त्रिपुरा व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील, मातुःश्री शांतादेवी पाटील, बंधू व महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री मा ना. श्री. सतेज पाटील, दै. पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, भाग्यश्री यांचे पती, ‘डीपीयू’ चे कुलपति, डॉ. पी.डी. पाटील, कनिष्ठ बंधू डॉ. संजय पाटील तसेच भाग्यश्रीताईंचे नृत्यगुरू तथा प्रसिद्ध नृत्य दिगदर्शक दीपक मजुमदार, यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला होती. श्री. मुजुमदार तसेच कार्यक्रमाचे नेपथ्य आणि संहिता लिहणाऱ्या डॉ. प्रकृती भास्कर यांचा सत्कार डॉ. पी.डी. पाटील व भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते तर कार्यक्रमाला संगीत-साथ करणाऱ्या कलाकारांचा सत्कार डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. यशराज पाटील, डॉ. स्मिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.    

*‘स्त्रियांनी न्यूनगंड सोडावा’*
हेमा मालिनी म्हणाल्या, ‘‘भरतनाट्य सहज शिकण्याची कला नाही. पुरुष किंवा स्त्रीला त्यासाठी वयाच्या सहा-सात वर्षांपासून सुरवात करावी लागते. पंधराव्या वर्षापर्यंत ही कला आत्मसात करीत २५ व्या वर्षी नृत्य कलाकार परिपूर्ण होऊ शकतो. भाग्यश्री यांनी मात्र कमाल केली. पाच नातवांच्या धनी झाल्यावर त्यांनी नृत्यशिक्षण सुरू केलं आणि अत्यंत खडतर तपश्चर्या करुन त्यांनी सहा वर्षांतच पहिले सादरीकरण केले. देवी ललिताच्या त्या निःस्मीम भक्त आहेत. त्या दैवी आशीर्वादामुळे त्यांनी हे साध्य केलं असावं. वयाच्या पस्तीशी-चाळीशीत आल्या की आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झाल्याची भावना स्त्रियांमध्ये रुजते. ते गैर आहे. स्त्रीने ठरवले तर ती वाढत्या वयासोबत नवनव्या कलांच्या माध्यमातून स्वतःला आकर्षक आणि फीट ठेवू शकते.’’ 

"भक्ती आणि निर्धार या जोरावर भाग्यश्री पाटील यांनी ही कला आत्मसात केली. ती पाहून मी स्तिमीत झाले आहे. स्त्रीला कुटुंबातून सहकार्य आणि प्रेरणा मिळाली तर ती काय करू शकते याचे डॉ. भाग्यश्री मूर्तीमंत उदाहरण आहे", असे प्रतिभाताई पाटील म्हणाल्या. डॉ. डी.वाय. पाटील, डॉ. जाधव, दीपक मजुमदार यांनीही मनोगत व्यक्त केले. 

भरतनाट्यम नृत्यशैलीमध्ये किमान सात वर्षे गुरूच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतल्यानंतर नृत्यशैलीच्या सर्वासक्षम सादरीकरणाला अरंगेत्रम म्हटले जाते. हे नृत्य सादर करणे नृत्यांगनेच्या व गुरूच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण असतो. हेमा मालिनी यांच्यापासून प्रेरणा घेत वयाच्या ५५व्या वर्षी दीपक मजुमदार शिष्यत्व पत्करुन भरतनाट्य शिकण्यास सुरवात केली. सहा वर्षांच्या खडतर तपश्चर्येनंतर त्यांनी आपले लक्ष्य साध्य केले. 

*'प्रत्येक स्त्रीमध्ये अद्भुत शक्ती'*
"नृत्यगुरु मजुमदार यांची मेहनत, कुटुंबातील सर्व सदस्यांचा पाठिंबा या जोरावर मी माझ्यातल्या विद्यार्थ्याचा शोध घेतला. असा विद्यार्थी की ज्याला शिकण्याची आस आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक अद्भुत शक्ती आहे. शरीर, मन आणि ध्येय याच्या बळावर आपण हे साध्य करू शकतो. पती आणि मुलांसह कुटुंबातील सर्वांनी मला हे लक्ष्य साध्य करण्यासाठी मदत केली", या शब्दांत डॉ. भाग्यश्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

*'पती असल्याचा अभिमान'*
"भाग्यश्री ऊर्फ जयाचे व्याप मी मोजू शकणार नाही. टाइम मॅनेजमेंट, दृढ निश्चय आणि आणि टिकून राहाण्याची शक्ती असा दुर्मीळ संयोग तिच्यामध्ये आहे. आमच्या ४० वर्षांच्या संसारात तिनं प्रचंड कष्ट घेतले. तिचं आयुष्य हा मूर्त कर्मयोग आहे. तिच्या आयुष्यातील आजच्या घटनेमुळे आणि यशामुळे पती असल्याचा मला अभिमान वाटतो", या शब्दांत डॉ. पी.डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. 

*पुष्पांजली ते मंगलम : विलक्षण अनुभूती*
भाग्यश्रीताईंनी जोग रागावर आधारित पुष्पांजली आणि गणपती स्तवनाने नृत्याची सुरवात केली. राग मल्लिकावर आधारित लक्ष्मी अष्टकम्, महिषासुरमर्दिनी स्रोत्रम्, जयजयवंती रागातील राम भजन, वृंदावनी सारंग रागातील थिलाना, यमनकल्याण रागातील अभंग, राग मल्लिकामधील आरती दशावतार व मंगलम् असे ७ नृत्यप्रकार सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. ठुमक चलत रामचंद्र….आणि सुंदर ते ध्यान या अभंगावरील नृत्याने तर प्रेक्षकांना ठेका धरायला लावले. प्रीती आणि प्रचिती, भक्ती आणि मैत्री, संयम आणि आसक्ती या भावनांचे मूर्त प्रकटीकरण आणि अनामिक नाजूक रंग भाग्यश्रीताईंच्या पहिल्याच सादरीकरणात होते. स्त्री ही दैवी शक्तीचे मानवी प्रतीक असल्याचा प्रत्यय त्यांनी रसिक प्रेक्षकांना दिला. उत्कट, विराट आणि प्राकृतिक स्त्रीत्वाचा आविष्कार त्यांनी दोन तासांच्या नृत्यामधून घडवाला. या नृत्याला विलक्षण अनुभूतीचे सौंदर्य होते.        

*भाग्यश्रीताईंची वाटचाल*
डी.वाय पाटील हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालयाची पूर्णवेळ जबाबदारी तसेच राइज एन शाईन या आंतरराष्ट्रीय कंपनीचा व्याप सांभाळून डॉ. भाग्यश्री पाटील यांनी ही कला आत्मसात केली. दोन मुलं डॉ. सोमनाथ, डॉ. यशराज, कन्या डॉ. सौ. स्मिता जाधव आणि पाच नातवंडांच्या गोतावळ्यात रमणाऱ्या कुटुंबवत्सल भाग्यश्रीताईंचे गेली सुमारे ३० वर्षे शिक्षण, आरोग्य सेवा, शेती, बायोटेक्नॉलॉजी, फलोत्पादन आणि फ्लोरीकल्चर तसेच महिला सबलीकरण या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे. सौ. पाटील यांचा महिला सक्षमीकरणावर विश्वास आहे. थेऊर येथे आपल्या कंपनीत ग्रामीण भागातील 95 टक्के महिला नोकरीला आहेत. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी. बचतगटसारख्या विशेष योजना त्यांनी सुरू केल्या आहेत. आजवरच्या कारकीर्दीत सौ. पाटील यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad