*शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांची सातारा जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी*
फलटण प्रतिनिधी
शेतक-यांना वीजबीले भरण्यासाठीची 50% सवलत 31 मार्च 2022 पर्यंत आहे. मागील पाच सहा वर्षात वीज महावितरणने शेतक-यांना वीजबीले न दिल्याने थकीत राहिलेली आहेत. त्याअगोदर शेतकरी नियमित वीजबीले भरत होता हे देखील एक सत्य आहे. याची नोंद घेऊन शेतक-यांना थकीत वीजबीले भरण्यासाठी 31 मार्च 2022 पर्यंत तीन महिन्यांची मुदत द्यावी व जे शेतकरी मुदतीत वीजबीले भरणार नाहीत त्यांचे कनेक्शन बंद करणेबाबत कार्यवाही करावी. परंतु शेतक-यांना कोणतीही पुर्वमुदत व पुर्वसुचना न देता डिपी बंद करु नयेत. अशी मागणी फलटण तालुक्यातील शेतक-यांच्यावतीने शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सातारा जिल्हाधिकारी श्री. शेखर सिंह यांचेकडे केली आहे.
वीज महावितरणकडे रिडींग घेण्यासाठी यंत्रणा अस्तित्वात नाही. अशातच येणारी सरासरी वीजबीले ही अयोग्य पद्धतीने जास्त आकारणी करुन आलेली असतात. त्यामुळे शेतक-यांच्या खात्यामधुन वीजबीले परस्पर कपात केली गेल्यास शेतक-यांकडे वीजबील दुरुस्तीचा कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. शेतक-यांच्या खात्यामधुन थेट पैसे कापले जाणार. यामुळे फलटण तालुक्यातील शेतक-यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वीजबीले भरण्यासाठी 31 मार्च 2022 पर्यंत 50% सवलतीची मुदत असताना फलटण वीज महावितरण वीजबीले भरण्यासाठी डिपी बंद करुन व वीजपुरवठा खंडित शेतक-यांवर दबाव आणत असल्याचे स्पष्ट मत शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी व्यक्त करुन याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचेकडे वीजबीले भरण्याकरीता मुदत मिळणेसाठी पाठपुरावा करणार असुन फलटण तालुक्यातील शेतक-यांवर अन्याय झाला तर फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलने केली जातील याची योग्य व गंभीर दखल प्रशासनाने आत्ताच घ्यावी असेही शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.