जावलीच्या रणांगणात शिवेंद्रसिंहराजेंचे प्रयत्न अयशस्वी
राजकारण संन्यास घेवू पण माघार घेणार नाही
बाबा तुमच्यासाठी काहीही करु पण एवढ्यावेळी माफ करा
सातारा :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील सर्वाधिक हॉट झालेल्या 'जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा' मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीचे नेते आ. शशिकांत शिंदे यांना सोपी करण्यासाठी आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांचे प्रयत्न अखेर शुक्रवारी अयशस्वी ठरले. 'बाबा तुमच्यासाठी काहीही करु; पण आता माघार घेणार नाही. तुम्ही माघार घ्यायला दबाव आणला तर आम्ही राजकारण सोडू देवू,' असा निर्वाणीचा इशारा ज्ञानदेव रांजणे, वसंतराव मानकुमरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तब्बल २८ मतदारांनी दिल्याने शिवेंद्रसिंहराजेही हतबल झाले आहेत.
आ. शशिकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी स्वत: शिवेंद्रसिंहराजे यांना शब्द टाकला. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांनी थेट रांजणे, वसंतराव मानकुमरे यांच्यासह २८ मतदारांना गाठले आणि त्यांच्याबरोबर बैठक घेतली. शिवेंद्रसिंहराजे यांनी मोठ्या प्रमाणावर बैठकीत रांजणे, मानकुमरे यांच्यावर दबाव आणला. जिल्ह्यात सहकारमंत्री, गृहराज्यमंत्री निवडणूक लढवत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी मतदारांनी आणि उमेदवारांनी कोणाचेच ऐकलेले नाही, अशावेळी आमच्यावरच फक्त दबाव का आणला जातोय..?, असा सवाल जावलीच्या भूमिपुत्रांनी शिवेंद्रसिंहराजे यांना केला. 'आम्ही तुमच्यासाठी काहीही करु, पण यावेळी माघार घ्यायला लावू नका,' अशी विनंती सर्व मतदारांनी एकमुखाने शिवेंद्रसिंहराजे यांना केली. 'आमच्यावर तुम्ही आणखी दबाव आणला तर आम्ही राजकीय संन्यास घेवून टाकू,' असे रांजणे यांनी सांगून टाकले आणि सर्व मतदारांनीही तीच भूमिका घेतली. 'आम्ही गावात आणि तालुक्यात जावून काय सांगायचे आणि लोकांना आम्ही कसे तोंड दाखवायचे,' असा सवालही मतदारांनी शिवेंद्रसिंहराजे यांना केला.
'खा. शरद पवारसाहेब यांनी आपल्याला माघार घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे आपल्याला त्यांचे ऐकले पाहिजे,' असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारांना सांगितले. 'माझ्या विनंतीचा विचार करा,' अशा शब्दात शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारांना साद घातली. मात्र, मतदारांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की जिल्हा बँक ही फक्त एकच निवडणूक नाही की तिथे माघार घेतली पाहिजे. पुढे प्रत्येक निवडणुकीत आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अन्य निवडणुकांमध्येही आम्हाला त्रास होणार आहे. 'गेली दीड महिना आम्ही घरापासून बाहेर आहोत. आम्ही गावातील लोकांना शब्द दिलाय की आम्ही ज्ञानदेव रांजणे यांच्याच बाजूने राहणार आहोत. त्यामुळे आम्ही काही वेगळे केले तर लोक आम्हाला माफ करणार नाहीत. आम्हाला गावात आणि तालुक्यात फिरायला जागा राहणार नाही. आम्ही पैसे घेतले, आम्ही विकले गेलो, अशाप्रकारचे आरोप आमच्यावर होतील. दीड महिना बाहेर जावून शेवटी तुम्ही काय केले. हेच करायचे होते तर इतके दिवस बाहेर का गेला, असे अनेक प्रश्न आम्हाला जनता विचारेल. आम्ही त्यांना कोणत्याप्रकारे उत्तर देवू शकतो हे तुम्हीच सांगा,' अशा शब्दात सर्वच मतदारांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमोर आपल्या भावना मांडल्या.
दरम्यान, मतदारांनी एकजुटीने उपस्थित केलेले प्रश्न आणि व्यक्त केलेल्या निर्धारापुढे शिवेंद्रसिंहराजेही निरुत्तर झाले. मतदारांना कितीही भावनिक साद घातली आणि त्यांच्यावर कितीही दबाव आणला तरी ते ऐकायला तयार होत नाहीत हे लक्षात आल्यावर शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीतून माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जावलीचा निकाल आता मतपेटीतूनच लागणार आहे.
राष्ट्रवादीनेच शशिकांत शिंदेंना घेरले..!
वसंतराव मानकुमरे आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये एका टेंडरमुळे मोठे वैर निर्माण झाले आहे. पूर्वीही अनेकवेळा शशिकांत शिंदे यांनी मानकुमरे यांना नामोहरम केले होते. मात्र यावेळी शशिकांत शिंदे यांना खिंडीत गाठण्याची पूर्ण संधी मानकुमरे यांना चालून आली आहे. ही संधी सोडण्याची मानकुमरे यांची तयारी नाही. त्यातच शशिकांत शिंदे यांना घेरण्यासाठी मानकुमरे यांना राष्ट्रवादीतूनच रसद मिळाली आहे. मानकुमरे यांना ज्यांनी टेंडर दिले होते ते नेते आणि ज्यांना जिल्हा बँकेचे चेअरमन व्हायचे आहे, अशा इच्छूक उमेदवारांनीच शशिकांत शिंदे यांचा कार्यक्रम पक्का केल्याची चर्चा आहे. कालांतराने त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. रांजणे आणि मानकुमरे हे दोघेही राष्ट्रवादीतच आहेत. त्यामुळे त्यांना कोणी कोणी रसद पुरवली असेल याचा शोध शशिकांत शिंदे यांना घ्यावा लागणार आहे.
एकाचवेळी मतदानासाठी मतदार
प्रकट होणार..!
राजस्थान, गोवा, कर्नाटक अशा वेगवेगळ्या राज्यात गेलेले मतदार महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. महाराष्ट्राच्या सीमेच्या आत आलेल्या मतदारांना शिवेंद्रसिंहराजे यांनी गाठले असले तरी मतदारांनी पुन्हा आपला ठिकाणा बदलला आहे. मतदार कोणाच्या संपर्कात येण्यास तयार नाहीत. जावलीचे मतदार मतदानादिवशीच एकत्र येणार असून एकाचवेळी २८ जण मतदान करणार आहेत, अशी व्यूहरचना वसंतराव मानकुमरे आणि ज्ञानदेव रांजणे यांनी ठरवली आहे.