ऊसाच्या एकरकमी FRP साठी सोलापुरमध्ये सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेचा धडक मोर्चा
दि. ०५ ऑक्टोबर
ऊसाच्या एफआरपीची रक्कम एकरकमी मिळावी, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेकडुन आज सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर आ. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची सन २०२०-२१ च्या गाळप हंगामातील ऊसाची थकित एफ आर पी अद्यापपर्यंत शेतक-यांच्या खात्यावर जमा केलेली नाही, अशा कारखान्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. तसेच ऊसाच्या FRP ची रक्कम शेतक-यांना एकरकमी देण्याचा कायदा असतांनासुध्दा साखर कारखानदार FRP चे तुकडे करुन शेतक-यांना बिले देत आहेत. त्यामुळे सन २०२१-२२ च्या गाळप हंगामामध्ये ऊस FRP विनातुकडे एकरकमी शेतक-यांना मिळालीच पाहिजे, यावर रयत क्रांती संघटना ठाम असुन या प्रश्नासंदर्भात आ. सदाभाऊ खोत स्वतः केंद्रातील मंत्रांशी बोलले आहेत. ते पुढील आठवड्यात केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुषजी गोयल यांची भेट घेणार आहे. त्यामुळे साखर सम्राटांनी दिल्लीत जाऊन कितीही लॉबिंग केलं तरी FRP चे तुकडे पडू देणार नाही. प्रसंगी राज्यशासन व केंद्रशासनाच्या विरोधात लढा उभारु, पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन सदाभाऊ खोत यांनी जमलेल्या तमाम शेतकऱ्यांना दिले.
यावेळी आ. सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले, राज्य प्रवक्ते प्रा. सुहास पाटील,राहुल बिडवे, युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत थोरात, प्रवक्ते लालासो पाटील, एन डी चौगुले, अजय बागल, हजारो संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.