Type Here to Get Search Results !

डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ

                                         डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ


पिंपरी, ता. २९ जून - नवीन शैक्षणिक धोरणामुळे शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत आमूलाग्र बदल होतील असा विश्वास विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. धीरेंद्र पाल सिंग यांनी व्यक्त केला.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या १२ व्या पदवी प्रदान समारंभात डॉ. सिंग प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, कुलसचिव डॉ.  ए. एन. सूर्यकर, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव आणि कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर आणि शिक्षण तज्ज्ञ प्रा. राम ताकवले  यांना  'डॉक्टर ऑफ सायन्स' ही मानद पदवी देऊन गौरविण्यात आले.

डॉ सिंग म्हणाले, 'आपल्या देशात ३४ वर्षांनंतर नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला केद्र सरकारने मान्यता दिली आहे, नव्या धोरणामुळे आपल्या शिक्षण पद्धतीत समता प्रस्थापित होईल, गुणवत्ता वाढीस लागेल, जबाबदारीची जाणीव होईल आणि किफायतशीर शिक्षण उपलब्ध होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, नैतिक आणि भावनिक मूल्य रुजविण्यास मोठा हातभार लागेल.'

डॉ. सिंग पुढे म्हणाले, 'नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यशस्वी होण्यासाठी नामवंत शिक्षण संस्थांकडून मोठ्या अपेक्षा आणि सहकार्य मिळणे आवश्यक आहे. आपल्याला नव्या उत्साहाने, काळजीपूर्वक शैक्षणिक आराखड्याची पुनर्बांधणी करावी लागणार आहे.'

डॉ. पी. डी पाटील म्हणाले, 'प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात पदवी संपादन करणे हे मोठे यश असते. त्याच्यासाठी आणि  त्याच्या पालकांसाठी ती अभिमानाची बाब असते. शिक्षण संस्थांसाठी हे विद्यार्थी त्यांचे राजदूत म्हणून व्यावसायिक जीवनात प्रवेश करतात. विद्यार्थी त्यांच्या नव्या आणि स्वतंत्र मार्गावर वाटचाल सुरू करतात. वेगळ्या पद्धतीने विचार करू लागतात. त्यांनी शिक्षण घेताना प्राप्त केलेले ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्यांचा उपयोग समाजासाठी  मोलाचे योगदान देण्यासाठी करावे.''

डॉ. नारळीकर आणि डॉ. ताकवले यांनी सन्मानानिमित आपल्या भाषणात कृतज्ञता व्यक्त केली.

या समारंभात विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या २२ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले. विविध विद्याशाखातील १५७७ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १४ विद्यावाचस्पती (पीएच.डी.), ८७४ पदव्युत्तर पदवी, ६७९ पदवी  आणि १० पदविका या अभ्यासक्रमांचा  समावेश आहे.

 एम. बी. बी. एस. परीक्षेत सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या डॉ. सबा चौधरी हीचा कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
*(छायाचित्रात डावीकडून उजवीकडे)*
परीक्षा नियंत्रक  एम. एस. फिरंगे,  डॉ. यशराज पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. एन. जे. पवार, डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. स्मिता जाधव, कुलसचिव डॉ. ए. एन. सूर्यकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News