Type Here to Get Search Results !

म्यूकर मायकोसिसच्या ३५ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया,पिंपरीच्या डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाची कामगिरी

म्यूकर मायकोसिसच्या ३५ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पिंपरीच्या डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाची कामगिरी


पिंपरी दि. ३१ मे - पिंपरी येथील डॉ. डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या कान- नाक- घसा तज्ञ डॉ.(प्रा.) विनोद विश्वनाथ शिंदे व त्यांच्या टीमने कार्य कुशलतेने काळया बुरशीचा(म्यूकर मायकोसिस) संसर्ग झालेल्या सुमारे ३५ रुग्णांवर अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पूर्ण केल्या. या बाबतीत डॉ.  शिंदे म्हणाले की, कोरोनातुन बरे झाल्यावर रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या रुग्णांना बुरशीने ग्रासले होते. सुमारे ५० रुग्णांची तपासणी केली. यापैकी ३५ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करणे शक्य झाले.  यामध्ये बरेच रुग्ण हे मधुमेही आसल्याचे दिसून आले.  रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी डॉक्टरांनी परिश्रम घेतले  यामध्ये कान- नाक- घसा,  फिजिशियन, भूलतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, न्यूरो विभाग व रुग्णालयीयन व्यवस्थापनाचे सहकार्य लाभले. 


म्युकर मायकोसिस हा बुरशीचा घातक व  दुर्मीळ आजार आहे. ज्यांना कोविड झाल्यावर ऑक्सिजनची गरज पडते त्यांना आजारावर मात करण्यासाठी  स्टिरॉड इंजेक्शन/ गोळ्या  देण्याची गरज पडते. कोरोनाचा  विषाणू शरीरातील इंशुलिन निर्माण करणाऱ्या पेशींवर हल्ला करतो. यामुळे रुग्णाची शुगर अनियंत्रित होते. जे दीर्घकाळ व्हेंटीलेटर होते, ज्यांना अनियंत्रित शुगर आहे अशा रुग्णांना हा रोग होण्याची जास्त शक्यता आहे. या बुरशीचे जंतू व स्पोअर्स नाकावाटे रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतात. अति प्रमाणात  ऑक्सिजनमूळे म्युकोझा कोरडा पडतो. तसेच करोनानंतर रक्तातील लोहाचे प्रमाण वाढते. ही सर्व परिस्थिती या बुरशीच्या वाढीस अनुकूल स्थिती निर्माण करते. ही  बुरशी नाक  व  आजूबाजूच्या भागात शिरकाव करून तेथील पेशी नष्ट करतात. तेथे नेक्रोसिस करतात. ही  बुरशी पॅरानेझल सायनेसेस(नाकाभोवतीची  हवेची पोकळी), टाळू, डोळे, स्फेनोईड सायनस आणि शेवटी मेंदू पर्यंत जावून रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण करते अशी माहिती डॉ शिंदे यांनी दिली.  


म्यूकर मायकोसिसच्या लक्षणाबाबत माहिती देताना नेत्रतज्ज्ञ डॉ.अजिता शिंदे म्हणाल्या की,  चेहऱ्यावर सूज येणे,नाकातून पाणी येणे  ही  सुरुवातीची लक्षणे आहेत. कोविड आजारातून  नुकतेच बाहेर आलेल्या मधुमेही  रुग्णांनी या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. शिवाय नाक चोंदणे, डोकेदुखी,गालावरिल त्वचा बधिर होणे,डोळे सुजणे, दृष्टी अंधूक होणे, नाकातून रक्तस्त्राव होणे, दात व दाढ दुखणे ही इतर लक्षणे आहेत.

 डोळे,टाळू, पॅरानेझल सायनसेस या अवयवांना प्रादुर्भाव झाला आणि तेथे नेक्रोसिस झाल्यास रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी हे अवयव काढून टाकावे लागतात. आलेली ही  विकृती रुग्णासाठी तणावाशिल असते. जर हा संसर्ग मेंदूपर्यंत पोचला तर रुग्णाच्या जीवाला धोका होवू शकतो. मेंदूला संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी व जीव वाचवण्यासाठी ही  शस्त्रक्रिया केली जाते.

म्यूकर मायकोसिसचा प्रादुर्भाव कुठे कुठे व किती प्रमाणात आहे याचे सूक्ष्म निदान करण्यासाठी एमआरआय, सीटीस्कॅन या वैद्यकीय तंत्रज्ञानाचा आधार घेऊन उपचार केले जातात तसेच  लवकर निदान झाले तर पॅरनेझल सायनस मधील  नेक्रोज्ड   पेशी काढून इंजेक्शनद्वारे हा प्रसार रोखला जावू शकतो.यामध्ये शस्त्रक्रिया व मेडिकल उपचार दोन्ही फार महत्वाचे आहेत.

 प्रतिबंधात्मक उपाय- कोविड  व मधुमेह रुग्णानी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे, नाकात काळी बुरशी न होवू देणे, नाक स्वच्छ ठेवणे, लक्षणांची शंका आल्यास कान नाक घसा तज्ञांला दाखवून वेळीच उपचार करावे. वेळेत उपचार केल्यास डोळा व मेंदूकडे होणारा प्रसार रोखला जावू शकतो. नाकामध्ये सलाइन स्प्रे हा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येऊ शकतो.

कुलपती डॉ. पी. डी. पाटील, उप कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, विश्वस्त डॉ.  यशराज पाटील यांनी या यशस्वी शस्त्रक्रियेत सहभागी सर्वांचे कौतुक केले.  अधिष्ठाता डॉ. जे. एस भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.  एच.  एच.  चव्हाण यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या या टीमचा आम्हाला अभिमान असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News