मातीआड दडलेला शिवकालीन खजीना
पावनगडावर आज मोठ्या प्रमाणात दगडी तोफगोळे सापडले. हे तोफगोळे शिवकालीन असुन आकाराने लहान मोठे आहेत. आमच्या उपस्थितीत पुरातत्व आणि वनविभागाकडून या तोफगोळ्याचा पंचनामा करण्यात आला. या ठिकाणी सापडलेले 406 तोफगोळे पुरातत्व विभागाच्या ताब्यात दिले आहेत.
किल्ले पावनगडावर टिम पावनगड या संस्थेकडून गेल्या दिड दोन वर्षापासुन दुर्गसंवर्धनाच काम सुरू आहे. या गडावर दिशादर्शक फलक लावण्याचे काम गेल्या आठ दिवसापासुन सुरू आहे. हे काम करणाऱ्या अविनाश लंबे, निरंजन सुर्यवंशी, मारुती पाटील,सार्थक भोसले आदी दुर्गवीरांच्या संपर्कात सातत्याने होतो. चार दिवसापुर्वी गडावर जावुन झालेल्या कामाची आम्ही सर्वांनी पाहणीही केली होती.
आज सकाळी पावनगडावर जावून उर्वरीत चार बोर्ड लावण्याचे ठरले होते, यासाठी मी, राम यादव अविनाश लंबे, निरंजन सुर्यवंशी आणि सार्थक भोसले गडावर पोहचलो होतो. तुपाची विहिर आणि अन्य दोन ठिकाणचे बोर्ड लावून झाल्यानंतर मुख्य मंदीरासमोरील बोर्ड लावण्यासाठी केवळ पाच सहा इंच खोदकाम केले असता त्या ठिकाणी दगडी तोफगोळे असल्याचे आढळून आले. एकास एक लागुन जमिनीत दडलेला तोफगोळ्याचा खजिना दुर्ग संवर्धनाच्या निमित्याने उजेडात आला. केवळ दोन x दोन फुटाच्या खोलीत शेकडो तोफगोळे आढळून आले. पावनगड हा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे या गडावर शेकडो वर्षापासुन मातीआड लपलेला अनमोल खजीना बघून आम्हाला अत्यांनंद झाला.
पावनगडावर तोफगोळे सापडल्याची माहीती मी तत्काळ आमचे मार्गदर्शक आणि दुर्गसंवर्धन चळवळीचे प्रणेते खा.संभाजीराजे छत्रपती यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार वनविभागाच्या अधिकारी प्रियांका दळवी आणि भारतीय पुरातत्व विभागाचे विजय चव्हाण यांना दिली. या ठिकाणी मातीआड असलेल्या तोफ गोळयांची संख्या वाढतच चालल्याने वन आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही उत्खननाचे काम थांबवले आणि मिळालेले 406 तोफगोळे पुरातत्व विभागाच्या ताब्यात दिले.
वनविभागाच्या ताब्यात असलेल्या या पावनगडावर पुरातत्व विभागाच्या वतीने शास्त्रोक्त पध्दतीने उत्खनन व्हावे आणि मातीआड दडलेला खजीना उजेडात आणावा यासाठी आत्ता समस्थ दुर्गवीर संस्थांच्या वतीने प्रयत्न करायचे आहेत. कोणत्याही अपेक्षे शिवाय गडकोट संवर्धन हेच शिवकार्य म्हणून कार्य करणाऱ्या टिम पावनगडचे अभिनंदन.
सुखदेव गिरी
सदस्य : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती.