Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी मागे का हटत नाही ?



एका बाजूला खा. अमोल कोल्हे, धनंजय मुंढे यांची शिव स्वराज्य यात्रा झाली, दुसऱ्या बाजूला पवारसाहेबांचा झंझावाती दौरा सुरुय, तिसरीकडे खा. सुप्रिया सुळे यांचा विविध स्तरावरील घटकांशी संवाद सुरू आहे. अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे राज्यभरात फिरत आहेत, युवक आघाडी आक्रमकपने रस्त्यावर बेरोजगारीचा विषय घेऊन आंदोलन करत आहे, सोशल मीडियाची टीम प्रचंड सक्रिय होऊन भाजपच्या पेड ट्रोल्सना पुरून उरलीये.
.
.
देशातील सर्वात शक्तिशाली पक्षाने, त्यांच्या सर्वोच्च नेत्यांनी, आणि एकसाथ मीडियाने हेतुपूर्वक लक्ष्य करून दिवस रात्र चौफेर हल्ले सुरू ठेवले असताना, एकेक सरदार, मनसबदार फितूर होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्वांना ज्या चिवटपणे लढत दिली आहे आणि निवडणुकीत खंबीर पाय रोवून उभा आहे हे पाहिल्या नंतर  सव्वाशे वर्षांची काँग्रेस कुठे आहे. काँग्रेस चे नेते कुठे आहेत, आणि त्यांचे विविध सेल्स तरी काय करीत आहेत ? असा प्रश्न पडतो. नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या याच ऐदीपणामुळे काँग्रेस आकसत गेली, प्रत्येक निवडणुकीत माघारत गेली. पुन्हा उठावे, लढावे असे या पक्षाच्या नेत्यांना वाटत का नाही. .
.
.
वयाच्या 80 वर्षातही शरद पवार ज्या तडफेने बाहेर पडले , ती तडफ पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, नाना पटोले  यांना दाखवता येत नाही का ? राज्यात काँग्रेसला मानणारा वर्ग अजूनही लक्षणीय प्रमाणात आहे, काँग्रेस नेत्यांनी थोडंस जरी अंग झाडून काम केलं तरी तो वर्ग अधिक ncp चे केडर,  एक झाले तर राज्यातील निवडणूक एकतर्फी होणारच  नाही. सेना- भाजपने काँग्रेसला या लढाईत जमेसही धरलेले नाही. 
.
.
राज्यात निर्णायक विजयात त्यांची अडचण अजूनही राष्ट्रवादी आणि शरद पवार हेच आहेत. मोठ्या संख्येने फोडाफोडी करूनही राष्ट्रवादी हटताना, मनातून हरताना दिसत नाही. निवडणूक हरणार आहोत हे दिसत असूनही ज्या पद्धतीने राष्ट्रवादी मैदानात कंबर बांधून उभा आहे, नव्या दमाचे मावळे या लढाईत सामील होत आहेत ते पाहिल्या नंतर भाजप, सेना ही निवडणूक भलेही जिंकेल, मात्र राष्ट्रवादीला, पवारांच्या प्रभावाला पराभूत  करू शकनार नाहीत हे दिसू लागले आहे. राष्ट्रवादीतील जुनी धेंडे बाहेर गेल्यानंतर, वठणीला आलेल्या फांद्या मोडून पडल्यानंतर, खरड छाटणी झाल्यानंतर जशी नवी , लुसलुशीत पालवी फुटावी तशी राष्ट्रवादी ताजी-तवानी होताना दिसत आहे. या निवडणुकीत पराभूत  होऊनही राष्ट्रवादी नव्या धुमाऱ्यासह नव्या जोमाने फुलेल आणि मजबुतीने उभा राहील असे आशावादी चित्र निर्माण झाले आहे. 
.
उण्या, पुऱ्या वीस वर्षाच्या या पक्षाला अनेकवेळा अशा परिस्थितीतून जावे लागले आहे. दरवेळी नव्या जोमाने हा पक्ष उभा राहिला आहे. राष्ट्रवादी हा पक्ष जरी निवडून येणाऱ्या लोकांची टोळी म्हणून हिणवला गेलेला, कायम टीकेच्या केंद्रस्थानी ठेवून बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला पक्ष असला तरी शाहू, फुले, आंबडेकर यांचा समतावादी, उपेक्षित समाज घटकांना न्याय देण्याचे तत्व पाळणारा, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची  अस्मिता जोपासणारा आणि  सर्वांगीण विकासाचे व्हिजन असलेला पक्ष आहे. सहकार, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, सामाजिक न्याय अशा विषयाबाबत राष्ट्रवादीला स्वतःची भूमिका आहे, स्वतःचा कृती,कार्यक्रम ठरलेला आहे. सत्तेत असताना त्याची अमलबजावणी तेवढ्याच प्रभावीपणे केलेली आहे. काही गोष्टी चुकीच्या घडल्या असतील हे मान्य केले तरीही या पक्षाच्या काळात राज्य सर्वच पातळीवर देशात क्रमांक एकचे राज्य होते. या राज्याच्या अनेक धोरणांची अमलबजावणी देशपातळीवर झाली, जागतिक पातळीवर दखल घेतली गेली. असा लोकोपयोगी, देशोपयोगी कार्यक्रम या पक्षाकडे आहे. आणि याला कारण पक्षाचे नेतृत्व तळागाळात रुजणारे, पोहोचणारे आहे. म्हणून तर प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्रवादी च्या नेतृत्वास हजारभर पोलिसांचा बंदोबस्त घेऊन यात्रा काढाव्या लागल्या नाहीत. 
.
.
लोकांच्या प्रश्नांची जाण, ते सोडवण्याचा कृती कार्यक्रम या पक्षाकडे आहे म्हणूनच आजचा युवक पुन्हा पवारांकडे मोठ्या आशेने पाहतो आहे. आज एकूणच राज्यातील सामाजिक, राजकीय वातावरण उत्क्रांतीच्या वळणावर आहे. कात टाकून नव्या जोमाने पुढे जाण्याच्या अवस्थेत राज्याची एकूण परिस्थिती आहे. आणि नव्या बदलत्या परिस्थितीचे भान, तिच्याशी जुळवून, एकरूप होण्याची जाण या पक्षाच्या नेतृत्वाकडे आहे. म्हणूनच मोडून पडला म्हणता-म्हणता राष्ट्रवादी पुन्हा झेपावण्याच्या तयारीत आहे. कदाचित उशीर लागेल मात्र मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात तसे पवारांचा प्रभाव आणि त्यांचे राजकारण एवढ्यातच संपणारे नाही. हे गेल्या 8 दिवसांत महाराष्ट्राने पाहिलेही आहे.

#वातावरण_फिरलंय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad