Type Here to Get Search Results !

फडणवीसांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकणाऱ्यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस दिली आहे.

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातील घोटाळ्याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकणाऱ्यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस दिली आहे.



सांगली: कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातील घोटाळ्याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकणाऱ्यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस दिली आहे. यात स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडेंसह वाळवा तालुकाध्यक्ष भगवान जाधव यांचा समावेश आहे. पोलिसांच्या या नोटीसमुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. घोटाळ्यातील आरोपींना पकडून शिक्षा करण्याऐवजी जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांनाच दडपलं जात असल्याचा आरोप स्वाभिमानीने केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपने राज्यभर महाजनादेश यात्रा काढली होती. ही यात्रा सांगलीत आलेली असताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला कडकनाथ कोंबड्या दाखवत निषेध केला होता. मुख्यमंत्र्यांचा ताफा इस्लामपूर येथून पलूसला जात असताना हा प्रकार घडला. ताफ्याला कोंबड्या दाखवत असल्याचे दिसताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली आणि रस्त्याच्या बाजूला ढकलले. त्यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या हातातील कडकनाथ कोंबड्या ताफ्यावर फेकल्या होत्या. पोलिसांनी कोंबड्या फेकणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली होती.

कोंबड्या फेकणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी सांगितलं होतं, “कडकनाथ घोटाळ्यातील सर्व आरोपींची संपत्ती जप्त करावी आणि दोषींना शिक्षा द्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांची या घोटाळ्यात फसवणूक झाली त्यांना नुकसान भरपाई मिळावी. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कडकनाथ कोंबड्या सोडल्या आणि अंडी फोडली.”

महारयत अॅग्रो कंपनीने आमिष दाखवून राज्यभरातील शेतकऱ्यांची 500 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यानंतरच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकल्या. त्यानंतर पोलिसांनी तडीपारीची नोटीस दिली आहे.

कडकनाथ कोंबडी व्यवसाय घोटाळा काय आहे?

महारयत अॅग्रो कंपनीने कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय करण्यासाठी राज्यभरातील शेतकरी बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये घेतले. मात्र अवघ्या 2 वर्षांतच कंपनीने आपली प्रमुख कार्यालये बंद केल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. कंपनीकडून राज्यभरात 500 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे या कंपनीचे प्रमुख कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे जवळचे नातेवाईक असल्याचा आरोपही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत राजू शेट्टी यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवल्याने या गैरव्यवहाराला राजकीय आश्रय असल्याचा गंभीर आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे. यावर बोलताना त्यांनी सदाभाऊ खोत यांचा “कोंबडी चोर” असा उल्लेख केला होता. महारयत अॅग्रोचे प्रमुख सदाभाऊ खोत यांचे जवळचे नातेवाईक असल्याचा आरोप झाल्यानंतर हे आरोप सिद्ध करण्याचं आव्हान खोत यांनी दिलं आहे. त्याला स्वाभिमानी कडून प्रत्युत्तर देण्यात आलं. संबंधित नातेवाईकाच्या लग्नाची पत्रिका स्वाभिमानीकडून सोशल मीडियात व्हायरल करण्यात आली, ज्यात सदाभाऊ खोत यांच्या नावाचा उल्लेख आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad