● मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षांचे रोपण
मोखाडा | सौरभ कामडी
खोडाळा : दहावी बारावीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव गिरीवासी सेवा मंडळ, कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी कला, वाणिज्य व विज्ञान आणि मातोश्री यशोदाबाई मुरलीधर मोहिते कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खोडाळा या महाविद्यालयाच्या १० व्या वर्धापनदिनी करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात नॅशनल दलित मोमेंट्स फॉर जस्टीसचे राज्य सचिव वैभव गीते, भाऊराव तायडे आणि विकी शिलवंत यांच्या शुभहस्ते वृक्षांचे रोपण करण्यात आले.
मोहिते महाविद्यालय दरवर्षी आपल्या वर्धापन दिनानिमित्त दहावी, बारावीत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव करून प्रोत्साहित करते. याही वर्षी महाविद्यालयाच्या १० व्या वर्धापनदिनी मोखाड्यासह वाडा, जव्हार, शहापूर, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील दहावी, बारावीत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून गौरविण्यात आले. यात आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीनेही सहभाग नोंदविला.
आदिवासी आणि मागासवर्गीय मुलं शिकावीत आणि आपल्या आदिवासी समाजाचे नाव उज्वल करावे या उद्देशाने आपण शिक्षणाची दारे खुले केल्याचे प्रतिपादन गिरीवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ चंद्रमणी मोहिते यांनी केले. वटवृक्षाच्या पारंब्याप्रमाणे महाविद्यालयात विविध शाखा येऊन महाविद्यालयाची वर्षागणिक प्रगती होत आहे. येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी या शिक्षण संकुलाचा लाभ घेऊन आपली उन्नती साधावी असे प्रतिपादन मोखाडा पंचायत समिती उपसभापती तथा आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी केले. यावेळी माजी उपसभापती एकनाथ झुगरे, मोखाडा तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पालवे यांनीही आपल्या मनोगतातून महाविद्यालयाला वर्धापन दिनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे खजिनदार भास्कर खोळंबे, सदस्य सुशांत मोहिते, ज्योती कडलग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील, उपप्राचार्य प्रा. यशवंत शिद, प्रा. तुकाराम रोकडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवर्तन काशीद, प्रा. माधुरी अहिरे, प्रा.रघुनाथ मोरे, प्रा. मेघा सोनटक्के, सिद्धार्थ मोहिते, मयुरी नागवंशी, नामदेव ठोंबरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नवनाथ शिंगवे यांनी केले तर मान्यवरांचे आभार गिरीवासी सेवा मंडळाचे सचिव प्रा. दीपक कडलग यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
---------