पुणे- उद्या २० ऑगस्ट रोजी डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्तेला १० वर्षे उलटून गेली तरी एकही आरोपीचा शोध लागलेला नाही त्या निषेधार्थ आज "आवाज दो - हम एक है, लढेंगे जितेंगे', 'दहा वर्षे खुनाची -कार्यरत विवेकी असंतोषाची', 'फुले शाहू आंबेडकर - आम्ही सारे दाभोलकर', 'हिंसा के खिलाफ - मानवता की और' या घोषणा देत आणि मशाल प्रज्वलित करून कार्यकर्त्यांनी डॉ नरेंद्र दाभोलकर यांना 10 व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला अभिवादन करण्यात आले . दाभोलकर यांचा खून करण्यात आलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुल येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्मृतिजागर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पावसात उभे राहून कार्यकर्त्यानी गाणी, घोषणा आणि मनोगताद्वारे अभिवादन केले. अनिल करवीर, परिक्रमा खोत, माधुरी गायकवाड, राहुल उजागरे, अनिल दरेकर, स्वप्नील मानव यांनी गाणी सादर केली. मेणबत्या आणि मशाल पेटवून कार्यकर्त्यानी दाभोलकरांना अभिवादन केले.
महा.अंनिससह विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. महा. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, पुणे जिल्हा अध्यक्ष मानव कांबळे, विचारवंत आनंद करंदीकर, प्रधानसचिव संजय बनसोडे यांनी अभिवादन मनोगत व्यक्त केले. डॉ ठकसेन गोराणे यांनी प्रास्ताविक तर विशाल विमल यांनी सूत्रसंचलन समारोप केला.
प्रतिनिधी/ भानुदास गायकवाड