धनादेश न वटल्या प्रकरणी बार्शी येथील न्यायालयाने एका आरोपीस एक वर्षाच्या कैदेची शिक्षा व धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट रकमेचा दंड सुनावला आहे. रावसाहेब नामदेव घाडगे (रा. गाताचीवाडी, ता. बार्शी) यांच्याकडून महादेव लिंबराज अंबुरे याने दोन लाख रुपये हातउसने घेतले होते. त्यानंतर अंबुरे याच्याकडे घाडगे यांनी रकमेची मागणी केली असता, त्यांना एक-एक लाख रुपयांचे दोन धनादेश अंबुरेने दिले होते. फिर्यादीने ते धनादेश त्यांच्या खात्यावर जमा केले असता दोन्ही धनादेश अंबुरेच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्यामुळे न वटता परत आले होते. त्यानंतर फिर्यादीने आरोपीस वकिलामार्फत रक्कम मागणीची कायदेशीर नोटीस दिली होती. मात्र त्यानंतरही महादेव अंबुरेने धनादेशाची नमूद रक्कम दिली नव्हती. त्यामुळे फिर्यादीने बार्शी येथील न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. यावर सहायक मुख्य न्यायदंडाधिकारी ए. पी. खानोरकर यांनी आरोपीस एक वर्ष कैद व धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट दंड अशी शिक्षा ठोठावली. आरोपीने दंडाची रक्कम फिर्यादीला एक महिन्याच्या आत देण्याचे आदेश दिले. यामध्ये आरोपीने ही रक्कम न दिल्यास तीन महिने साधी कैदही सुनावण्यात आली. फिर्यादीच्या वतीने ॲड.एस. बी. भोरे व ॲड. श्रीकृष्ण जाधव यांनी काम पाहिले.