टाकपाड्यात घर जळुन लाखोंचे नुकसान सुदैवाने जीवीतहानी टळली,तालुक्यात अग्नीशामक दलाची गरज
मोखाडा : सौरभ कामडी
मोखाडा नगरपंचायत मधील टाकपाडा या गावातील प्रतिष्ठीत नागरिक व रेशन दुकानदार भिका माळी यांच्या दुकानाला रात्री २ वाजता शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागल्याने त्यांच्या दुकानातील संपूर्ण माल जळुन खाक झाला असून घरातील काहि रोख रक्कम आणि किराणा सामान महत्वाची कागदपत्रे दागिने असा लाखोंचे नुकसान झाले आहे.सुदैवाने घरातील व्यक्तीना जाग आल्याने जीवीतहानी टळली मात्र आगीने उग्ररुप धारण केल्यामुळे आगीला रोखण्यात अपयश आल्याने संपूर्ण घर जळुनखाक झाले आहे.तालुक्याला अग्नीशमक दल नसल्याने पुन्हा एकदा ईतर ठीकाणापासून अग्नीशामक वाहन यायला उशीर झाला गावकऱ्यांनी आग विझवताना प्रयत्नांची शर्थ केली मात्र घर वाचवु शकले नसल्याने या घटेनंतर तालुक्यातुन हळहळ व्यक्त होत आहे.
टाकपाडा गावातील रेशन दुकानदार भिका माळी यांच्या आईचे छत्र हरपल्यानंतर त्यांनी खचून न जाता आपल्या मावशीच्या घरी राहून शुन्यातून आपले अस्तित्व निर्माण करुन रेशनदुकानासह, किराणा दुकान सुरू केले गावातील गरीब होतकरू मुलांने एवढी प्रगती केल्याने गावातील सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते.भिका माळी यांचा साधाभोळा स्वभाव हीच त्यांच्या प्रगतीची पोच पावती होती.अशा या शुन्यातून आपले अस्तित्व निर्माण केलेल्या भिका माळी यांच्या राहत्या घरासह दुकानाला रात्री दीड दोन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागल्याने त्यांच्या जुन्या घरात असलेले किराणा दुकानातील सर्व सामान, साखरेचे ३५ कट्टे, दोन फ्रीज त्यामधील सर्व शितपेय, लाकडी फर्निचर, टिव्ही, फॅन, कागदपत्रे विशेष म्हणजे जुन्या घराला लाकडाचा वापर जास्त असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते.तर या आगीत ५ लाख रुपये रोख रक्कम जळाली असुन जवळपास नऊ दहा लाखांचे सामान जळुन खाक झाले आहे असल्याची माहिती भिका माळी यांनी दिली.
दुकानातील दोन फ्रीजच्या कॉम्प्रेसर ला आग लागल्यानंतर जोराचा स्फोट झाला त्यानंतर आम्हाला जाग आली व आम्ही आरडाओरडा केली असे भिका माळी यांनी सांगितले व त्यांनतर गावातील तरुणांनी एकत्र येऊन पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला.
नगराध्यक्ष अमोल पाटील यांची अशीही मदत
सदर घटनेची माहिती नगराध्यक्ष अमोल पाटील यांना मिळताच त्यानी नगरपंचायत तसेच स्वतःच्या पाण्याचे टॅंकर देवून आगविझवण्याचा प्रयत्न केला मात्र लाकडी जुने घर असल्याने आगीने रुद्ररुप धारणॅ केले होते कदाचित मोखाडा तालुक्यासाठी स्वतंत्र अग्नीशामक गाडी असती तर अशा आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता येवू शकले असते.मात्र ज्या पद्धतीने नगरपंचायतची स्वतःची रुग्णवाहिका,स्वतःचे पाण्याचे टॅंकर,स्वतःचे डंपींग ग्राउंड आहे त्याप्रमाणे मूख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरच अग्नीशामक दलाचे वाहनही उपलब्ध करून देण्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.