Type Here to Get Search Results !

कचरा डेपोप्रकरणी फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांना निलंबित करण्याची मागणी



कचरा डेपोप्रकरणी फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) करणार : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख


नगरपालिकेच्या बेजबाबदारीमुळे फलटणमधील घनकचरा प्रक्रिया केंद्र मृत अवस्थेत आहे, तर खुल्या जागेवरील अस्वच्छतेचा कळस गाठणारा कचरा डेपो जिवंत अवस्थेत आहे. या दोन्हीही उलट क्रिया मानवी आरोग्यास घातक आहेत. घनकचरा प्रक्रिया केंद्र आहे की घनचक्कर प्रक्रिया केंद्र आहे समजत नाही. फलटण शहरातील "मुता-यांची दयनीय अवस्था" या घाणेरड्या समस्येनंतर, आता सस्तेवाडी-कांबळेश्वर रस्त्यालगतच्या कचरा डेपोने फलटण तालुक्याच्या शिरपेचात अस्वच्छतेचा आणखी एक अवमानाचा तुरा रोवला आहे असा संताप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी कचरा डेपोची पाहणी केल्यानंतर व्यक्त केला.


फलटण नगरपरिषदेने प्लास्टिक बंदी केलेली असुनही कचरा डेपोत प्लास्टिकचे साम्राज्य कसे ? हाच कचरा पेटवल्यानंतर प्लास्टिकमुळे वातावरण प्रदुषित होत आहे. यावर सातारा प्रदुषण नियंत्रण मंडळ काही कारवाई करणार आहे की नाही ? मृत जनावरे कचरा डेपोत उघड्यावर टाकली जातात. मोकाट कुत्री मृत जनावरांचे लचके तोडतात. त्यामुळे माशा किड्यांची निर्मिती होत असुन एकंदरीत मानवी आरोग्यास धोका निर्माण होत आहे. सर्वत्र आसपासच्या परिसरात दुर्गंधी व अस्वच्छतेचे वातावरण आहे.


मृत अवस्थेत असलेले घनकचरा प्रक्रिया केंद्र व खुल्या जागेवर असलेल्या कचरा डेपोपासुन तीस चाळीस फुट अंतरावर फलटण शहराला पाणी पुरवठा करणारा पाणी साठवण तलाव आहे. फलटण तालुक्याला अपयशाच्या शिखरावर नेऊन ठेवणारे हे असले विचार व कृती काय कामाची ? यामुळे खरंच नागरिकांचे आरोग्य सुरक्षित आहे का ? नगरपालिका काय करत आहे ? 


या खुल्या जागेवरचा कचरा डेपो हटवुन स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून भिंतीचे कंपाऊड उभारणे गरजेचे आहे. अशी मागणी फलटण वनविभागीय कार्यालयाकडेही करणार आहे. नगरपालिकेने कचरा डेपो विषयावर ठोस कार्यवाही करणे अपेक्षित आहे. फक्त कागदावर मजबूत बाजू मांडुन नाही चालणार. फक्त स्वच्छता निरिक्षक, सुरक्षा रक्षक नेमणुक करुन व सी सी टिव्ही कॅमेरे लावुन काही निष्पन्न होणार नाही, त्याने कच-याची योग्य विल्हेवाट लागणार नाही. त्यासाठी योग्य निर्णय व सक्षम अमंलबजावणीची गरज आहे. नगरपालिकेने कच-यावर प्रक्रिया (बायोमायनिंग) करणेसाठी 9 वेळा टेंडर प्रसिद्धी केली आहे त्याचं काय झालं ? अशाप्रकारे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी फलटण नगरपरिषदेच्या चुकीच्या कार्यपध्दतीवर प्रश्नांचा भडिमार करत नगरपरिषदेचे अक्षरशः वाभाडे काढले. 


शिवसेना पक्षाच्यावतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सदर समस्या सोडवण्यासाठी शिवसैनिक कटीबद्ध आहेत. फलटण तालुक्यातील सर्व निसर्गप्रेमींना व फलटणकर नागरिकांना, सस्तेवाडी ग्रामस्थांना बरोबर घेऊन भव्य आंदोलन उभे करू. फलटण तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीस देखील सोबत घेऊ. तात्पुरती ठिगळं लावलेली दुरुस्ती नगरपालिकेकडुन नको, नागरिकांच्या आरोग्यास पोषक असणारा कायमस्वरूपी पर्याय फलटणकरांना आवश्यक आहे. फलटणकरांच्या तक्रारीचे निवारण झाल्याशिवाय व न्याय मिळेपर्यंत आता हा लढा थांबणार नाही. लवकरच फलटण नगरपरिषदेला खुल्या जागेवरील कचरा डेपो हटवण्यासाठी व मृत अवस्थेत असलेले घनकचरा प्रक्रिया केंद्र सुरु करण्यासाठी निवेदन देऊन पंधरा दिवसाचा अवधी निवेदनाद्वारे देणार आहोत. नगरपालिकेने योग्य दखल न घेतल्यास नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनाच या सर्व प्रकारास जबाबदार धरुन शिवसेनेच्यावतीने त्यांचेवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी सातारा जिल्हाधिकारी यांचेकडे करुन शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन हाती घेऊ. तसेच याची संपुर्ण जबाबदारी नगरपालिका व फलटण तालुका प्रशासनाची प्रशासनाची राहील असा इशारा शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी दिलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News