Type Here to Get Search Results !

मोदीसाहेब, माझी सर्व जमीन तुमच्या नावावर करतो, तुम्ही फक्त ‘हे’ काम करून दाखवा; महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच थेट पंतप्रधानांना आव्हान

मोदीसाहेब, माझी सर्व जमीन तुमच्या नावावर करतो, तुम्ही फक्त ‘हे’ काम करून दाखवा; महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच थेट पंतप्रधानांना आव्हान




गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बळीराजा निसर्गाच्या या दुष्टचक्रामुळे पुरता भरडला गेला आहे. रब्बी हंगामातील पिके ऐन काढणीच्या अवस्थेत असतानाच कोसळलेला हा पाऊस शेती पिकांसाठी अतिशय मारक ठरला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले असून आता जगायचं कसं हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढ्यात येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत बीडच्या एका शेतकऱ्याने आपली व्यथा थेट पंतप्रधान मोदी यांच्या पुढ्यात मांडली आहे. शिवाय या शेतकऱ्याने मोदींना एक आव्हान देखील केल आहे. यामुळे सध्या या बीडच्या शेतकऱ्याची संपूर्ण राज्यभर चर्चा पहावयास मिळत आहे.

बीडच्या टिप्पतवाडी येथील अशोक ठेकळे यांच अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. म्हणून त्यांनी केंद्र शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. शिवाय शासनाच्या शेतीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून मोदी साहेब तुम्ही आम्हाला चार महिन्यात 2 हजार देता, या 2 हजारात तुम्ही फक्त एका दिवसाचा तुमचा दौरा करून दाखवा.

मी माझी सर्व जमीन तुमच्या नावावर करतो, असं आव्हान या शेतकऱ्याने केल आहे. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना आता भरीव मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली असून यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान सहन करावं लागलं. यातून कसाबसा बळीराजा सावरला निदान रब्बी हंगामात तरी आपल्याला चांगली कमाई होईल अशी शेतकऱ्यांची भोळी-भाबडी आशा होती.

मात्र आता अवकाळीने शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावून घेतला आहे. म्हणून अशोक यांनी मदतीची मागणी केली आहे. अशोक यांच्याकडे अडीच एकर शेत जमीन असून यामध्ये त्यांनी रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी केली होती. पीक चांगले जोमदार भरले होते मात्र शनिवारी जिल्ह्यातील बहुतांशी भागात गारपीट झाली यामध्ये अशोक यांचे ज्वारीचे पीक भुईसपाट झाले. त्यांचा स्वप्नांचा यामुळे चुराडा झाला. आता जगाव कसं, परिवाराचा उदरनिर्वाह भागवावा कसा? हाच मोठा प्रश्न त्यांच्यापुढ्यात आहे.

शेतमालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, कापसाला भाव नाही, कापूस वेचणीचे दर वाढलेले होते तरी कापसाला चांगला भाव मिळेल म्हणून वेचणी करून कापूस घरात ठेवला आहे. पण आता कापसाला पण भाव मिळेना. आता पैसा कुठून येणार, घर कसं चालणार? असा सवाल उपस्थित करत या शेतकऱ्याने शासनच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत असल्याचा मोठा आरोप केला आहे. अशोक म्हणतात की शासन केवळ घोषणा करण्यात पटाईत आहे.


पीएम मोदी दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये टाकतात मात्र या दोन हजार साधा किराणा देखील येत नाही. मग घर कसं चालणार. असं म्हणत या शेतकऱ्याने मदतीची मागणी केली आहे. निश्चितच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि आता रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकरी बांधवांचा हाता-तोंडाशी आलेला खास पुन्हा एकदा हिरावला गेला आहे. या अवकाळीने फक्त पिकांचा सत्यानाश केला असं नाही तर शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा देखील या ठिकाणी चुराडा झाला आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना आता शासनाकडून भरीव मदतीची आशा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad