जव्हार - दिनेश आंबेकर
दिनांक ९ मार्च २०२३ रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जव्हार – १ अंतर्गत साकुर ग्रामपंचायत मधील आखर येथे महिला मेळावा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती जव्हार सभापती विजया लहारे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत जिल्हा परिषद शाळा आखर च्या विदयार्थीनी मधुर आवाजात स्वागत गीत सांगून केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सभापती विजया लहारे व प्रमुख पाहुणे दैनात लहारे, मार्गदर्शक मनोज कामडी यांचे स्वागत बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश विभूते यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
तसेच उपस्थित सर्व गावातील महिला सरपंच, उपसरपंच यांचा यावेळी सभापती यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन जागतिक महिला दिनानिमित्त विशेष सन्मान केला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यसेविका पोलादे मॅडम यांनी केले. त्यानंतर दैनात लहारे यांनी उपस्थित महिलांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा देऊन महिला दिनाचे महत्व पटवून दिले.त्यानंतर पंचायत समितीच्या सभापती विजया लहारे मॅडम यांनी महिलांना ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यामागची पार्श्वभूमी, महिला दिनाचे महत्व व महिलांच्या समस्या, हक्क अधिकार, महिला आरक्षण याविषयी विविध उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक मनोज कामडी यांनी महिला दिन हा १९७५ पासून आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात असून जव्हार सारख्या आदिवासी भागात सुध्दा अनेक शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत, गाव पाड्यामध्ये मोठ्या संख्येने ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा होत असून महिला सक्षमीकरण होतांना दिसत आहे.
तसेच महिलांना सध्या राजकारणात ५०% आरक्षण असून आता महिला सुद्धा राष्ट्रपती, राज्यपाल, मंत्री, खासदार आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षा, सभापती, सरपंच अश्या उच्च पदावर असल्याची महिलांची उदाहरणे देऊन महिलांमध्ये नेतृत्व असल्याचे सांगितले. आजची महिला ही पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होत आहेत.तसेच भारतीय संविधान मध्ये महिलांसाठी असलेले विविध कायदे, बालविवाह कायदा, महिला संरक्षण कायदा, माहिलांचे हक्क व अधिकार व शासकीय योजना याविषयी मार्गदर्शन केले. महिलांनी स्वतःची आर्थिक प्रगती करण्यासाठी स्वतः चा एक व्यवसाय केला पाहिजे जेणेकरून आपले आर्थिक प्रगती होऊ शकते असे मत मांडले.
त्यानंतर साकुर ग्रामपंचायतच्या सरपंच यांनी महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षिका मेतकर मॅडम यांनी त्याच्या समस्या तसेच आदिवासी भागातील कुपोषण, बालविवाह, विधवा, एकल महिलांच्या समस्या मांडल्या व त्याच्यावर काम करण्याची गरज असल्याचे मत मांडले.
तसेच यावेळी उपस्थित महिलांनी आपले मनोगत व गाणे सांगितले त्यानंतर सर्व महिलांनी एकट्ट येऊन सामुहिक नृत्य सादर केले. सदर कार्यक्रमा प्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश विभूते, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, जव्हार प्रकल्प अंतर्गत सर्व अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व महिला भगिनी, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.