मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय जव्हार येथे वैविध्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल.
जव्हार - दिनेश आंबेकर
मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय जव्हार येथे वैविध्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल. ज्येष्ठ नागरिक यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला मोकळा संवाद….
राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय जव्हार येथे २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिनानिमित्त यशवंत सार्वजनिक वाचनालयाच्या सरस्वती दालनात विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाची सुरवात ही ज्ञानपीठ पुरस्कार कविश्रेष्ठ कुसुमाग्रज वि.वा शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी सुरवातीला जेष्ठ नागरिक संघ जव्हार यांना पदाधिकाऱ्यांना वाचनालयातर्फे कथा, कादंबरी,चा पुस्तक संच भेट देण्यात आला व जेष्ठ नागरिक, विद्यार्थी यांच्या मध्ये पुस्तक परिसंवाद झाला. तसेच जिल्हा परिषद शाळा जांभूळविहीर येथील विद्यार्थ्यासाठी डॉ.शरद मुकणे यांच्या कन्येच्या स्मरणार्थ शुद्धलेखन स्पर्धा घेण्यात आली व बक्षीस देण्यात आले.
तसेच मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व, मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत तसेच कुसुमाग्रज यांच्या कार्याची व त्यांनी केलेल्या लेखन कलेची जोपासना केली पाहिजे तसेच सध्याच्या परिस्थितीत इंग्रजी भाषेचा व संगणक प्रणालीचा वाढता प्रभाव कमी करून मराठी भाषेला प्राधान्य दिले पाहिजे असे मत यावेळी विनायक शेळके साहेब यांनी मांडले.
विविध उपस्थित कवींनी तयार केलेल्या कविता सादर केल्या तसेच नुकताच महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मा. श्री.भाऊसाहेब शेटे सर यांचा राजे यशवंत सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक भेटवस्तू देऊन अध्यक्ष प्रकाश चुंबळे साहेब यांच्या हस्ते सह्रदय सत्कार करण्यांत आला.
यावेळी शेटे यांनी उपस्थित सर्वाना मराठी राजभाषा दिन का साजरा केला जातो व त्यांनी आतापर्यंत केलेल्या शैक्षणिक कार्याविषयीं मार्गदर्शन केले.