मूतखडा आणि होमिओपॅथी
मूत्रपिंडात अथवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मूतखडा असे म्हणतात. जेव्हा लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ एका ठिकाणी जमा होतात, तेव्हा मूतखडा तयार होतो.
मूतखडा कसा होतो ?
सामान्यतः मूत्रपिंडामध्ये लघवी तयार होण्याचे कार्य अविरत सुरू असते. ही तयार झालेली लघवी मूत्र नलिकेद्वारे मूञाशयामध्ये हळूहळू साठत असते. एका विशिष्ट मर्यादेनंतर व्यक्तीला लघवी आल्याची जाणीव होते व लघवी बाहेर टाकल्या जाते. मूत्रपिंडामध्ये तयार होणाऱ्या लघवीमध्ये अनेक घटक असतात. जेव्हा यातील न विरघळणारे स्फटिकजन्य पदार्थ एकत्र जमा होतात तेव्हा मूतखडा तयार होतो.
कारणे
मूतखडा होण्याची अनेक कारणे आहेत. लघवीचे प्रमाण कमी झाल्याने अथवा लघवी मधील न विरघळणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने सुद्धा मूतखडा तयार होतो . वारंवार मूत्रपिंडाचा जंतू संसर्ग होणे , मूत्रमार्गात अडथळा असणे (हायड्रॉनेफ्रॉसीस), कमी पाणी पिणाऱ्यांना, उच्च रक्तदाबाचे रुग्ण, मधुमेही व्यक्ती , अति लठ्ठपणा, अति वजन उचलणाऱ्या व्यक्तींमध्ये मूतखडा होण्याचा धोका अधिक असतो. लघवीमध्ये ऑक्झॅलेट, कॅल्शियम, यूरिक ॲसिड , सिस्टीन यांचे प्रमाण अधिक असल्याने मूतखडा होतो. याशिवाय स्त्रियांमध्ये गर्भारपणात प्रोजेस्टेरॉनचा स्त्राव अधिक वाढल्याने लघवीचा वेग मंदावतो व त्याने खडे तयार होतात. आनुवंशिकता आणि अगोदर मूतखडा झालेला असेल तर त्याच व्यक्तीमध्ये पुन्हा मूतखडा होण्याची शक्यता असते.
प्रकार
१. कॅल्शियम ऑक्झॅलेट - बहुसंख्य मूतखडे हे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे बनलेले असतात. लघवीचे प्रमाण कमी असणाऱ्यांमध्ये व रक्तातील कॅल्शियम चे प्रमाण वाढल्याने व लघवी मधील कॅल्शियम चे प्रमाण जास्त असणाऱ्यांमध्ये हे खडे आढळून येतात
२.कॅल्शियम फॉस्फेट - लघवीतील कॅल्शियम व फॉस्फेट चे प्रमाण वाढल्याने अल्कलीयुक्त लघवीमध्ये हे खडे आढळतात, रेनल ट्यूब्यूलार अॅसिडोसिस, ऑस्टिओमलेशिया, पेरिऑस्टी ओसिस, हाइपरपॅराथायरॉईडीझम असणाऱ्या रुग्णांमध्ये हे खडे आढळून येतात.
३. युरिक अॅसिड - रक्तातील यूरिक ॲसिड चे प्रमाण अधिक असणाऱ्यांमध्ये, ल्यूकेमिया, यकृताचे आजार, गठिया रोग (गाऊट), तीव्र प्रमाणातील सोरायसिस असणाऱ्यांमध्ये हे खडे होतात.
४. ट्रिपल फॉस्फेट - वारंवार लघवीचा जंतुसंसर्ग होणाऱ्या व्यक्तींमध्ये हे खडे प्रामुख्याने आढळतात
५. सिस्टीन - लघवीतील सिस्टीन चे प्रमाण वाढल्याने हे खडे होतात.
लक्षणे
मूतखडा जोपर्यंत मूत्रपिंड, मूत्रवाहिनी अथवा मूञाशय यामध्ये फिरत नाही, तोपर्यंत शक्यतो लक्षणे दिसत नाहीत. तरीसुद्धा प्रामुख्याने खालील लक्षणे आढळून येतात.
खालच्या ओटीपोटात अचानक पणे दुखणे , दुखणे पाठीमागून पोटाकडे येणे ,पोट व पाठीमध्ये तीव्र वेदना होणे, लघवी करताना वेदना व जळजळ होणे, लघवीवाटे रक्त जाणे , लघवीला दुर्गंधी येणे , गर्द लाल लघवी होणे, वारंवार लघवीचा जंतुसंसर्ग होणे, मळमळ, उलट्या होणे ,वारंवार लघवी करण्याची तीव्र इच्छा होणे, थंडी वाजून ताप येणे.
निदान
पोटाचा एक्स-रे, अल्ट्रा सोनोग्राफी, सिटीस्कॅन, इंट्राव्हेनस पायेलोग्राम(IVP) - याद्वारे मूत्रमार्गातील खड्यांची संख्या, त्यांचे स्थान व आकारमान, कारणे, खडा अडकला आहे की नाही याविषयी निदान लागते.
मूञतपासणी - याद्वारे लघवीतील जंतुसंसर्गाचे निदान लागते व मूतखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण लक्षात येते.
रक्त तपासणी - मूत्रपिंडाची कार्यक्षमता, जंतुसंसर्गाचे घटक, खडे बनवण्यासाठी लागणारे घटक( कॅल्शियम, यूरिक ॲसिड, फॉस्फेट, ऑक्झॅलेट) यांचे निदान लागते.
उपचार
कमी आकार असलेले मूतखडे शक्यतो आपोआप विरघळून लघवीवाटे निघून जातात.
पाणी भरपूर पिणे , दररोज किमान तीन ते चार लिटर पाणी पिण्याने लघवी पातळ होते व मूतखडे विरघळण्यास मदत होते. मूञमार्गातील स्नायू शिथिल करणाऱ्या औषधांच्या वापरामुळे व वेदनाशामक औषधांमुळे खडे सहजरीत्या पुढे सरकण्यास मदत होते.
एक्स्ट्राकॉर्पोरीयल शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी ( ESWL) - यामध्ये ध्वनी लहरींचा उपयोग करून तीव्र कंपने निर्माण केल्या जातात, ज्यामुळे मोठ्या खड्याचे छोटे छोटे तुकडे होतात जे नंतर विरघळून जातात.
परक्यूटॅनियस नेफ्रोलिथोटॉमी (PCNL) - खडयांचा आकार खूप मोठा असल्यास, खडयांची संख्या जास्त असल्यास, किंवा खडा विशिष्ट स्थानी अडकला असल्यास याचा वापर करतात. या प्रक्रियेत रुग्णाच्या पाठीत एक लहान चिरा देऊन एक नळी थेट मूत्रपिंडात घातली जाते, नंतर अल्ट्रासाउंड प्रोबद्वारे खड्यांचे विघटन केले जाते व बाहेर काढल्या जाते.
काय करावे - पाणी भरपूर प्रमाणात प्यावे ,दररोज किमान तीन लिटर पाणी प्यावे , लघवी आल्याची जाणीव झाल्यास लगेच लघवी करावी ,लघवी रोखून धरू नये ,त्याने लघवी संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. भरपूर पाणी असलेले पदार्थ खावे.ऑक्झॅलेट, युरिक अॅसिड, कॅल्शियम असलेले अन्नपदार्थ कमी खावे ,पालक, टोमॅटो, वांगे, गवार ,चवळी, मांसाहार, कॉफी, मीठ यांचे सेवन कमीत कमी करावे.
होमिओपॅथिक उपचार. होमिओपॅथी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. होमिओपॅथी मध्ये रुग्णाच्या शारीरिक, मानसिक, भावनिक लक्षणांचा सखोल अभ्यास केला जातो. होमिओपॅथिक औषधांमुळे मूतखडा तर निघून जातोच शिवाय मूत्रपिंडावर उपचार केल्यामुळे वारंवार होणारी मूतखड्याची समस्या टाळता येते . खालील काही होमिओपॅथिक औषधांमुळे मूतखड्याची व्याधी मुळापासून नष्ट करता येते .
१. बर्बेरीस व्हल्गॅरीस - लघवी करताना मांडीमध्ये व कमरेमध्ये तीव्र वेदना होणे ,लघवी घट्ट फेसाळ व लालसर होणे ,पूर्ण लघवी केल्यानंतर सुद्धा लघवी शिल्लक असल्याचे भावना होणे, डाव्या मूञपिंडा पासून मूत्राशयापर्यंत कापल्यासारख्या वेदना होणे
२.एपिस मेलीफिका - लघवी करताना जळजळ होणे, आगयुक्त वेदना होणे , थोडी थोडी लघवी होणे, तहान कमीच असणे
३. सारसापरीला - लघवी संपताना तीव्र वेदना होणे, बसल्यावर लघवी अडखळत होणे, लघवी करताना किंचाळणे, लघवीमध्ये पांढरे खडे असणे
४.लायकोपोडियम - गर्द लाल लघवी होणे, सुरुवातीला अडखळत लघवी होणे, लघवीला जोर लावावा लागणे, लघवी केल्यानंतर दुखणे कमी होणे, युरिक अॅसिडच्या खडयांसाठी उपयुक्त
५. कँथॅरीस - सतत लघवी आल्याची जाणीव होणे, थेंब थेंब लघवी होणे, लघवी करण्याची असहनीय इच्छा होणे, लघवीद्वारे रक्त जाणे
६. फॉस्फरस - लघवी मध्ये लाल भडक रक्त जाणे , लघवी फेसाळ असणे, मळमळ व उलटया होणे, थंड पिण्याने बरे वाटणे
७. कॅल्केरियाकार्ब - कॅल्शियम ऑक्झॅलेट व कॅल्शियम फॉस्फेट च्या खड्यांसाठी उपयुक्त, सतत बद्धकोष्ठता असणे
८.आर्टिका युरेन्स - युरिक ऍसिडच्या खड्यांसाठी उपयुक्त, रक्तामधील यूरिक ॲसिड वाढणे
९. बेंझॉइक अॅसिड - यूरिक ॲसिडच्या खड्यांसाठी उपयुक्त, लघवीला तीव्र वास असणे, लघवीला गडद लाल रंग असणे, मूत्राशयाचा दाह असणे
१०. हायड्रांजिया - कमरेमध्ये डाव्या भागात तीव्र वेदना होणे , लघवी मध्ये अडथळा असणे, लघवी मध्ये पांढरे क्षार असणे
११. पॅरेइरा ब्राव्हा - सतत लघवी आल्याची इच्छा होणे ,लघवीला जोरात कुंथावे लागणे, लघवी करताना मांड्यांमध्ये तीव्र वेदना होणे.
याशिवाय एकोनाईट, बेलाडोना, कोलोसिंथीस, मॅग फॉस, डायोस्कोरिया, टॅबॅकम ही औषधे मूतखड्याच्या अचानक उद्भवणाऱ्या दुखण्यासाठी लक्षणसमूहांचे साधर्म्य अभ्यासून उपयुक्त आहेत.