मागील काही दिवसांपासून पुणे शहरात दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानंतर पोलिसांनी आता आपले लक्ष दुचाकी चोरावर केंद्रित केले आहे. विश्रामबाग पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोरट्याला जेरबंद (Pune Crime News) केले आहे.त्याच्याकडून तब्बल 11 गुन्ह्यांची उकलकरून 17 दुचाकी जप्त केल्या आहेत.
विकास उद्धव माने (वय 34 , रा. टिळेकरनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. विश्रामबागमधील 5 व डेक्कन भागातील 6 असे एकूण 11 गुन्हे उघडकीस आले आहेत.
शहरात वाहन चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शहरात दररोज चार ते पाच वाहने चोरीला जात आहेत. पण, या घटना रोखण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे वास्तव आहे. तर, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण देखील अत्यल्प आहे. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहन चोऱ्या तसेच लुटमार व घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान, विश्रामबाग पोलीस चोरट्यांचा माग काढत होते.
यावेळी पोलीस अंमलदार हर्षल दुडम व अण्णा बोरूटे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संशयित चोरटा टिळक स्मारक मंदिराच्या समोरच्या गल्लीत आला आहे. यानुसार पथकाने याठिकाणी मध्यरात्री सापळा रचून त्याला पकडले.
त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याला ताब्यात घेऊन सखोल तपास केल्यानंतर त्याच्याकडून तब्बल 17 दुचाकी मिळाल्या. माहिती घेत असताना सर्व दुचाकी विश्रामबाग व डेक्कन परिसरातून चोरल्याचे समोर आले आहे. त्यातील 11 दुचाकीबाबत गुन्हेही (Pune Crime News) दाखल आहेत. तर उर्वरित 6 दुचाकी मालकांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. प्रतिनिधी: दिगंबर वाघमारे