कुटासा शाळेत गोड भाताने नववर्षाची सुरुवात ,खिचडी सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना झाला हर्ष!
कुशल भगत अकोट
आधी कोरोना त्यानंतर धान्य वितरकाचा वाद यामुळे जवळपास तीन वर्षापासून बंद असलेली खिचडी आज नववर्षात सुरू करण्यात आली.
शासन आदेशाप्रमाणे दोन जानेवारी २०२३ पासून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याबाबत सूचित करण्यात आले होते.
अकोट..पालक मजुरी करीता गेल्यानंतर बरेच विद्यार्थी हे उपाशी पोटीच शाळेत येतात पोटातच नसेल तर डोक्यात कोठून अभ्यास बसणार? त्यामुळे खिचडी सुरू होणे आवश्यक होते. त्यानुसार आज २ जानेवारी २०२३ ला पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गोड भात देण्याचे सुचित करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळा कुटासा येथे आज दोन जानेवारी सोमवारला विद्यार्थ्यांना मनुका, खोबरे, काजू मिश्रित गोड भाताने नवीन वर्षाची सुरुवात करून शापोआ देण्यात आला.आज शाळेतील २१९ पैकी १९५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
याप्रसंगी कुटासा पंचायत समिती सर्कलचे सदस्य सपनाताई ईश्वरदास झास्कर माजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ईश्वरदास झास्कर, विद्यमान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, राजू भोरे,शाळेचे मुख्याध्यापक विश्वास खापरे सर,तसेच सर्व शिक्षक तथा शालेय पोषण आहार शिजवणारे रामाभाऊ गावंडे उपस्थित होते.