न्यूक्लिअस बजेटमधील विविध योजनांसाठी लाभार्थ्यांना आवाहन
तळोदा एकात्मिक आदिवासी विकास विभागातर्गत सन 2022-2023 या वर्षांत केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्यूक्लिअस बजेट उपक्रमात विविध योजनांचा लाभ देण्यासाठी तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून 5 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या योजनेच्या ‘अ’- गटात उत्पन्न निर्मितीच्या व उत्पन्न वाढीच्या उपक्रमात मोहफुल संकलनासाठी जाळी, भगर काढणी यंत्र तसेच आदिवासी ग्रामपंचायती, बचतगटांना सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अनुदानावर भांडी संच पुरवठा करण्यासाठी 85 टक्के अर्थसहाय्य देण्यात येईल.
‘ब’-गट प्रशिक्षण योजनेत आदिवासी युवक युवतींना मराठी, इंग्रजी संगणक टंकलेखन प्रशिक्षण तसेच अनुसूचित जमातीच्या महिलांना तसेच युवतींना मॉन्टेसरी टिचर ट्रॅनिंग (अंगणवाडी सेविका) साठी प्रशिक्षण देण्यात येईल.
तर गट-‘क’ मानव साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणात्मक योजनेतून शासकीय आश्रमशाळांमध्ये शेवगा पोषण बाग लागवड करणे, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पस्तरीय विज्ञान व कला प्रदर्शन आयेाजन करणे तसेच विशेष मोहिमेंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना जातप्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र, आधारकार्ड काढून देण्यात येईल.
अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दारिद्र्य रेषेचा दाखला, आधार कार्ड, रहिवास दाखला, बॅक पासबूक, अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, ग्रामसभेचा ठराव, तसेच यापुर्वी इतर शासकीय योजनांमधुन लाभ न घेतल्याचा दाखला (स्वयंघोषणापत्र) इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमून्यातील अर्जाचे वाटप प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा जि. नंदुरबार येथे 22 डिसेंबर, 2022 ते 5 जानेवारी 2023 या कालावधीत (सुटीचे दिवस वगळून ) कार्यालयीन वेळेत वाटप केले व स्विकारले जातील, असे श्री. पत्की यांनी नमूद केले आहे.