शहादा, ता.१८ : शहादा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसाठी सुमारे ७०.७७ टक्के मतदान झाले असून सर्वत्र किरकोळ वाद वगळता शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. तालुक्यातील काही मतदान केंद्रांना निवडणूक निरीक्षक तथा अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी भेट देत पाहणी केली. त्यांच्या समवेत तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.
शहादा तालुक्यातील पाडळदा बु., खैरवे -भडगाव,
धांद्रे बु. , निंभोरा, म्हसावद ,
बहिरपूर, बिलाडी त. ह.,
कलमाडी त. बो., जीवननगर,
कळंबू आदी दहा गावांमध्ये गाव कारभारी निवडण्यासाठी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली.त्यात सरपंच पदासाठी ४५ तर सदस्यपदाचा ६४ जागांसाठी १६८ उमेदवार निवडूकीचा रिंगणात होते.निवडणूकित ६ हजार ६७८ स्त्री तर ७ हजार ०७७ पुरुष मतदारांनी मतदानाच्या हक्क बजावला. त्यात एकूण १९ हजार ४३७ मतदारांपैकी १३ हजार ७५५ मतदारांनी मतदानाच्या हक्क बजावला.त्याची टक्केवारी सुमारे ७०.७७ आहे. दरम्यान तालुक्यातील कलमाडी, जीवन नगर ,पाडळदे व म्हसावद ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील मतदान केंद्रांना निवडणूक निरीक्षक तथा अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी भेट देत पाहणी केली.
२० ला मतमोजणी....
दरम्यान तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींची मतमोजणी मंगळवारी (ता.२०) ला येथील मोहिदा रस्त्यावरील नवीन तहसील कार्यालयात होणार असून सकाळी दहा वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.यावेळी मतमोजणीसाठी एकूण चार टेबल लावण्यात येणार असून प्रत्येक टेबलावर निवडणूक निर्णय अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक असे तीन व्यक्ती राहणार असून एकूण तीन फेऱ्या होणार आहेत. अशी माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.