ग्रामीण भागात जुनाट धोकेदायक वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर
तळोदा तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील रस्त्यावर जुनाट धोकेदायक वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला असून ह्या वृक्षांमुळे मोठा अपघात होऊ शकतो असे बोलले जात असुन संबंधित विभागाने रस्त्यावरील जीर्ण झाडांची पाहणी करून त्यांची तोड करावी अशी मागणी होत आहे.
वनविभागामार्फत दरवर्षी लाखो रोपे लावुन वृक्षारोपण करण्यात येऊन झाडांचे संगोपन करण्यात येते मात्र धोकेदायक झाडांकडे दुर्लक्ष होऊन त्यामुळे वादळी पाऊस, अवकाळी पाऊस यामुळे ह्या झाडांची पडझळ वाढली असुन घर, वाहने, मनुष्य,पशुपक्षी ह्यांना नुकसान पोहोचत असल्याने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर ऊसतोड सुरू असुन त्याचबरोबर केळी, पपई काढणी सुरू असल्याने ह्या जीर्ण झाडांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत.
वीजपुरवठाही होतो वारंवार खंडित
जीर्ण झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने एकदाचा जीर्ण झाडांचा प्रश्न मार्गी लागल्यास वारावादळातही विद्युतपुरवठा सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे हवीच परंतु जीर्ण झाडांमुळे जीव जात असेल, मोठे नुकसान होत असेल तर ते हटवणे हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात येत असुन तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यावरील जीर्ण झाडे हटवण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.