व्यापाऱ्यांनी केळीला योग्य भाव देण्याची मागणी
तळोदा तालुक्यातील रांझणी, चिनोदा, प्रतापपुर परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर केळी लागवड करण्यात येऊन केळी उत्पादन घेण्यात येत असते. परिसरात यावर्षीही केळी तयार झाली असल्याचे चित्र असुन केळीला चांगला भाव असूनही केळी खरेदी करणाऱ्या काही व्यापाऱ्यांकडून शेतकरीना बाजारभावापेक्षा दीडशे ते दोनशे रुपये कमी भावाने खरेदी करण्यात येत असल्याने शेतकरींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असुन त्यांच्याकडून एकमेकांशी संवाद साधून योग्य भाव देणाऱ्या व्यापाऱ्यालाच केळी देण्यात येत आहे.
परिसरातील लिंबाच्या रंगाच्या,लांबलचक केळीच्या घडांना विशेष मागणी असुन ह्या केळीला शहरी भागात मॉलमध्ये चांगली मागणी असल्याचे सांगण्यात येत असुन, व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दरात केळी खरेदी करून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा भावात विकत असतात मग बळीराजालाच का कमी भाव दिला जातो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान काही व्यापाऱ्यांकडून मी दरवर्षी केळी कापतो, तुम्हाला ऍडव्हान्स देतो असे भावनिकपणे सांगत शेतकरीला केळी देण्यास भाग पाडत असुन जाणकार शेतकरींकडून मात्र केळी उत्पादक शेतकरींनी व्यापाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये तसेच बाजारभाव पाहुन व शेतकरींशी चर्चा करूनच केळी द्यावी असे सांगण्यात येत आहे.
सध्या केळी नवती 1465,कांदेबाग 1465,पिलबाग 1365,वापसी 1075 असे भाव असले तरी व्यापारी कमी भावाने केळीला मागत असल्याचे चित्र आहे.