Type Here to Get Search Results !

म्हसा खांबलिंगेश्वर यात्रेसाठी शासनाची मंजुरी



म्हसा खांबलिंगेश्वर यात्रेसाठी शासनाची मंजुरी 


आमदार किसन कथोरे यांची नागपूर येथील पत्रकार परिषदेतून माहिती


जनावरांचा बाजार भरणार असल्याने यात्रेकरू उत्साहीत

मुरबाड दिनांक 27 प्रतिनिधी लक्ष्मण पवार )


   महाराष्ट्रात गुरांच्या बाजारासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या मुरबाडच्या म्हसा यात्रेला पौष पौर्णिमेपासून सुरुवात होत आहे. 




गेली तीन वर्ष कोरोनामुळे यात्रा भरली नव्हती.मात्र यावर्षी यात्रा भरणार असल्याने यंदा विक्रमी गर्दी होईल असा अंदाज आहे. संभाव्य परस्थिती लक्षात घेऊन प्रशासन यात्रेसाठी सज्ज झाले आहे. 


यात्रेत गुरांचा बाजार भरणार नाही अशी चर्चा होती.मात्र गुरांचा बाजार भरणार आहे अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशन येथे गेले असता पत्रकार परिषद घेऊन दिल्याने यात्रेकरुंचा उत्साह द्विगुणित झाला आहे.




 शंकराचे जागृत देवस्थान म्हणून मुरबाड तालुक्यातील म्हसा हे ठिकाण ओळखले जाते. महिनाभर चालणारी ही यात्रा लाखो शिवभक्तांसाठी एक पर्वणीच ठरते.सुमारे शंभर ते सव्वाशे एकर जागेत भरणाऱ्या तमाशे,मनोरंजनाचे विविध खेळ,दुकाने यांनी यात्रा फुलून जाते.ही यात्रा गुरांच्या बाजारासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असून येथे राज्याबाहेरून जनावरे विक्रीसाठी आणली जातात.दरवर्षी यात्रेत कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असून त्यातून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळतो.शुक्रवारी सहा जानेवारीला या यात्रेला प्रारंभ होत आहे.पहिलाच दिवस कामगार वर्गाच्या सुट्टीचा असल्याने पहिल्याच दिवशी विक्रमी गर्दी होऊ शकते असा अंदाज आहे.  




                                     मुरबाड-कर्जत मार्गावर मुरबाड पासून १२ किमी,तर कर्जत पासून ४२ किमी अंतरावर असणारे म्हसा हे गाव छोटे असले तरी या गावाला शंकराचे जागृत देवस्थान म्हणून अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. याठिकाणी खांबातून शिवलिंग मिळाल्याने या जागृत देवस्थानाला 'खांबलिंगेश्वर' नाव पडले आहे. 


विविध प्रकारच्या घोंगड्यांच्या  बाजारासाठी ही यात्रा प्रसिद्ध असून घोंगड्या, चादरी,ब्लान्केट्स यांची याठिकाणी विक्रमी खरेदी होते.यात्रा काळात भक्तांच्या सोयीसाठी मुरबाड आगाराने जादा बसेसची सोय केली आहे.यातून दरवर्षी एस.टी.ला कोट्यावधीचा नफा मिळतो.यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी चोख बंदोबस्ताची तयारी केली आहे.यात्रेकरूंच्या सोयीसाठी ग्रामपंचायत,महसूल,पंचायत समिती प्रशासन,त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था मेहनत घेतात.


महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मी गुरांचा बाजार भरविण्याची विनंती केली आहे.त्यांनी ते मान्य केले आहे.ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून तशी परवानगी मिळाली आहे.या यात्रेचा गुरांचा बाजार मोठा असतो.लंपीचा प्रादुर्भाव लक्षात घेता जनावरांचे लसीकरण करूनच त्यांना बाजारात प्रवेश देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.   


 *आमदार किसन कथोरे*


तीन वर्ष यात्रा भरली नाही.यंदा यात्रा पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज आहे.त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन यात्रेकरुंच्या सोईसाठी तत्पर आहे.भाविकांनी मोठ्या प्रमाणात यावे.यावर्षी आम्ही गरीब, गरजू यात्रेकरुंच्या जेवणाची सोय केली आहे. 


*बाळू पष्टे, अध्यक्ष म्हसोबा खाम्बलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad