एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन
नंदुरबार :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष सन 2023-2024 प्रवेशासाठी इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता विद्यार्थ्यांकडून 21 जानेवारी, 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी हा अनुसूचित जमाती, आदिम जमातीचा किंवा डीएनटी, एन.टी. एस.एन.टी असावा. तर इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील रिक्त अनुशेष भरण्याकरिता विद्यार्थी अनुसूचित जाती, आदिम जमातीचा असणे बंधनकारक राहील. प्रवेशासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न सरासरी 6 लाखापेक्षा कमी असावे. अर्जासोबत जन्म दाखला, बोनाफाईड सर्टीफिकेट व इतर आवश्यक सर्व कागदपत्राची सांक्षाकित प्रती जोडणे आवश्यक असेल. शासकीय, निमशासकीय सेवतील कर्मचाऱ्यांच्या पालकांच्या पाल्यांना अर्ज करता येणार नाही. प्रवेशासाठी रविवार 26 फेब्रुवारी, 2023 रोजी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येईल.
प्रवेश पूर्व स्पर्धा परिक्षेकरीता शासकीय,अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अनुसूचित जमाती व आदिम जमातीचे किंवा डीएनटी, एनटी, एसएनटी विद्यार्थी पात्र राहतील. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते आठवी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता अनुक्रमे इयत्ता सहावी ते नववी प्रवेशास पात्र राहतील. प्रत्येक एकलव्य स्कुलमध्ये इयत्ता सहावी करीता 30 मुले व 30 मुली अशी प्रवेश क्षमता राहील.
सन 2023-24 मध्ये इयत्ता सातवी ते नववी करीता ज्या एकलव्य शाळांमध्ये विद्यार्थी अनुशेष असेल त्याच जागा भरण्यात येतील. विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे व त्यांच्या प्राधान्य क्रमानुसार प्रवेश देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आवेदन पत्रात प्रवेश पाहिजे असलेल्या एकलव्य शाळांबाबत पाच पसंतीक्रम द्यावेत. परीक्षेकरीता शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकणारा विद्यार्थी इयत्ता सहावी करिता अर्ज करु शकतो.त्याचप्रमाणे इयत्ता सहावी मध्ये शिकणारा विद्यार्थी इयत्ता सातवीसाठी, इयत्ता आठवी करिता शिकणारा विद्यार्थी हा इयत्ता नववी करीता अर्ज करु शकतो. अर्ज करतेवेळी अचुक इयत्ता नोंदविणे आवश्यक राहील.
एकलव्य मॉडेल रेसिडेंसियल स्कूलमध्ये प्रवेशासाठी अर्ज एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय तळोदा, एकलव्य रेसिडेंशियल पब्लीक स्कूल,सलसाडी ता.तळोदा, एकलव्य रेसिडेंशियल पब्लीक स्कूल अलीविहीर व तालंबा ता.अक्कलकुवा येथे उपलब्ध करुन देण्यात आले असून परिपूर्ण अर्ज भरुन 21 जानेवारी,2023 पर्यंत तळोदा तालुक्यासाठीचे अर्ज शासकीय आश्रमशाळा, अलिविहीर ता.अक्कलकुवा, अक्कलकुवा तालुक्यातील अर्ज शासकीय आश्रमशाळा, तालंबा ता.अक्कलकुवा तसेच धडगांव तालुक्यातील अर्ज शासकीय आश्रमशाळा सलसाडी ता.तळोदा जि.नंदुरबार येथे स्विकारण्यात येतील. प्रकल्प कार्यालय, तळोदा येथे अर्ज स्विकारण्यात येणार नाही. यांची नोंद घ्यावी. असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे