टेंभुर्णी,ता. ३१ : माढा तालुक्यातील बेंबळे येथील ऊस उत्पादक वाहन मालक प्रशांत भोसले उर्फ आण्णासाहेब महादेव भोसले ( वय ५० ) यांची मध्यप्रदेशातील ऊस तोडणी मजुरांच्या टोळीने निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी (ता. ३०) रात्री घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
बेंबळे येथील वाहन मालक प्रशांत उर्फ आण्णासाहेब भोसले हे माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करतात. मध्यप्रदेशात ऊस तोडणी मजूर मिळतात असे समजले होते. जळगाव जिल्ह्यातील तुकाराम पावरा रा. बोरमळी ( ता. चोपडा) या मुकादमाशी ऊस तोड मजूरांच्या टोळीसंदर्भात चर्चा झाली होती.
या हंगामातील ऊस तोड करण्यासाठी मध्यप्रदेशातील ऊस तोड मजूरांच्या टोळी आणण्यासाठी आण्णासाहेब भोसले, त्यांचा भाचा प्रमोद रेडे व स्कॉर्पिओ चालक असे तिघेजण बेंबळे येथून गेले होते.
बोरमळी येथून मुकादम तुकाराम पावरा यास घेऊन ते मध्यप्रदेशातील सेंधवा येथे परवा गेले होते. चाचेरिया (मध्यप्रदेश) येथील ऊस तोड मजूरांच्या टोळीला कोयत्यास प्रत्येकी पन्नास हजार रूपये प्रमाणे उचल देऊन एका टॅम्पोमध्ये मजूरांची टोळी घेऊन रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निघाले. स्कॉर्पिओमधून प्रमोद रेडे, मुकादम तुकाराम पावरा व चालक असेतिघेजण टेंम्पोच्या मागून येत होते तर ऊस तोड मजुरांबरोबर आण्णासाहेब भोसले टॅम्पोमध्ये बसून येत होते. काही अंतर पुढे आल्यानंतर
स्कॉर्पिओवर दगडफेक होऊ लागल्याने स्कॉर्पिओ टॅम्पोच्या पुढे वेगाने जाऊन पाठीमागून येत असलेल्या टेंम्पोची वाट पाहू लागले पण बराच वेळ झाला तरी टॅम्पो आला नाही.
या दरम्यान परत त्याच रस्त्याने माघारी जात असताना रस्त्यावर आण्णासाहेब भोसले हे पडल्याचे दिसले. आण्णासाहेब भोसले यांच्या गुप्तांगाला जबर मारहाण करून नंतर त्यांच्या पायावरून टॅम्पो घालून ऊस तोड मजूरांच्या टोळीने त्यांचा निर्घृण हत्या केली. ऊस तोड मजूरांची टोळी यानंतर टॅम्पोसह फरार झाली होती. भाचा प्रमोद रेडे यांनी तातडीने महाराष्ट्रातील शिरपूर पोलीस ठाण्यात आण्णासाहेब भोसले यांचा मृतदेह घेऊन आले. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना समजली. बेंबळे तेथील नागरिक दोन जीपमधून मध्यप्रदेशातील घटनास्थळी गेले आहेत.