मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्यासाठी कट रचला जात असल्याची माहितीही गुप्तचर विभागाला मिळाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या असून, तपास सुरू केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यापूर्वी नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीही एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात पाठवण्यात आले होते. पत्रासह धमकीचा एक फोनही आला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आणि ठाण्यातील निवासस्थानी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तर धमकीच्या फोननंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
नलक्षलवाद्यांकडून धमकी
महाविकास आघाडी सरकार काळातही गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री असताना एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. धमकी मिळाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचा दौरा केला होता. सरकारने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली असून त्याचा या प्रकरणाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. या आधी नक्षलवाद्यांकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धमकी आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.