झणझणे सासवड येथील वाघेश्वरी मंदिरानजीकचा रस्ता ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करण्यासाठी प्रशासनाने खोदला होता. यावर्षी पाऊस सातत्याने जोराचा झाल्यामुळे ग्रामस्थांना त्या रस्त्यावरुन जाणे येण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागला आहे. गाड्या चिखलात अडकुन बसल्या, घसरुन अपघात झाले, सर्वांची सर्व कामे अडकुन पडली. त्यावेळी फलटण पंचायत समिती गटविकास अधिकारी अमिता गावडे यांना 06/09/2022 रोजी फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने लेखी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यानंतर सदर रस्त्यावर अर्धवट ठिकाणी ओबडधोबड मुरुम टाकण्यात आला. अर्धवट मुरुम टाकल्याने चिखल व्हायचा तो होतच आहे. तसेच ओबडधोबड मुरुम टाकुन दिल्याने किंवा रोलर फिरवुन सपाटीकरण न केल्याने प्रवासासाठी अडचण होत आहे असे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
पाण्याची टाकी अस्तित्वात नसताना व सदर कामकाज पुर्तता करण्यासाठी दोन वर्षे कालावधी शिल्लक असताना ऐन पावसाळ्यात सदर कामकाजास परवानगी कोणी व का दिली. तसेच गटविकास अधिकारी यांनी आदेश देऊनही सदर रस्ता खोदल्यानंतरही मुरुम टाकुन व रोलर फिरवुन पुर्ववत का करण्यात आला नाही. गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिनांक 27/09/2022 रोजी पुन्हा एकदा फलटण पंचायत समिती गटविकास अधिकारी अमिता गावडे यांना सदर रस्त्याचे रोलर फिरवुन मुरमीकरण करुन रस्ता पुर्ववत करण्यासाठी व सदर रस्ता खोदकामाची चौकशी करुन दोषी आढळणारांवर कठोर कारवाई करण्यासाठीचे निवेदन फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने देण्यात आले. परंतु एक महिना झाले तरीही गटविकास अधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याची माहिती शिवसेना फलटण तालुका प्रमुख झणझणे यांनी दिली.
गटविकास अधिकारी अमिता गावडे यांची पंचायत समिती कार्यालयात कमी उपस्थिती असणे, फोन न उचलणे, कामांची पुर्तता न करणे, सार्वजनिक समस्यांकडे दुर्लक्ष करणे आदी तक्रारीसंह गटविकास अधिकारी यांच्या निलंबनाची मागणी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांचेकडे फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने ई-मेलद्वारे करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी राजकीय हितसंबंध जोपासत असुन त्यांना प्रशासकीय व फलटण तालुक्यातील जनतेच्या सार्वजनिक कामात काही स्वारस्य राहिले नसल्याची तक्रार सदर ई-मेलमध्ये करण्यात आली आहे. सदर तक्रार सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात देखील करण्यात आली आहे.
सदर प्रकरणात न्यायपुर्ण योग्य कार्यवाही न झाल्यास फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन हाती घेण्याची भुमिका शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी बोलुन दाखवली.