स्व.गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे एकनिष्ठ राहणे हीच सर्वांची फार मोठी जबाबदारी- प्रा.भाई विठ्ठलराव शिंदे
सांगोला(प्रतिनिधी):- स्व.गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे आपण सर्वांनी एकनिष्ठ राहणे एवढीच आपली फार मोठी जबाबदारी आहे.ती जबाबदारी शेकापचे बहाद्दर कार्यकर्ते स्विकारतील अशी अपेक्षा आहे. रात्रदिवस डोळ्यात तेल घालून जागृत राहून देशमुख कुटुंबाचे हात बळकट केले तर शेतकरी कामगार पक्षाचे काम चांगल्या पध्दतीने चालेल. शेकापची संघटना मजबूत करुया, त्यांच्या पाठीशी उभा राहुया व दोन डॉक्टरांना चांगल्या पध्दतीचे पाठबळ देवूया, अशी अपेक्षा व्यक्त करत आबासाहेबांनी शेकाप माध्यमातून ज्या पध्दतीने तालुक्याचा विकास केला त्याचपध्दतीने यापुढील काळात सांगोला तालुक्याचा विकास करण्यास डॉक्टर बंधूना मदत करुया, असे प्रतिपादन शेकापचे माजी चिटणीस प्रा.विठ्ठलराव शिंदे यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने गुरुवार दि.15 सप्टेंबर रोजी लोणविरे, हणमंतगाव, निजामपूर, मानेगाव, पाचेगाव, उदनवाडी, बुध्देहाळ, सोमेवाडी, चोपडी, बलवडी, नाझरे, अनकाढाळ, राजुरी या गावात डॉ.अनिकेत देशमुख यांचा गावभेट दौरा संपन्न झाला. या गावभेट दौर्याप्रसंगी शेकापचे माजी चिटणीस प्रा.विठ्ठलराव शिंदे बोलत होते. यावेळी डॉ.अनिकेत देशमुख , ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा देशमुख, प्रा.विठ्ठलराव शिंदे सर, चिटणीस दादासाहेब बाबर, श्री.बाबासाहेब करांडे, श्री.विजय शिंदे, श्री.शिंगाडे श्री.बाळासाहेब काटकर, श्री.अमोल खरात, बाळकृष्ण कोकरे, दिपक गोडसे, प्रा.हणमंत कोळवले यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी,आजी माजी जि.प. सदस्य, पं.स.सदस्य, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन यांच्यासह तरुण कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी माजी चिटणीस प्रा.भाई विठ्ठलराव शिंदे सर बोलत होते.
पुढे बोलताना प्रा.भाई विठ्ठलराव शिंदे सर म्हणाले, विधीमंडळात आबासाहेबांचा पुतळा उभा राहणार आहे. हे खूप मोठे योगदान आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशंवतराव चव्हाण यांच्यापासून तत्कालीन मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे मुख्यमंत्री आबासाहेबांनी हाताळले त्यांचे मार्गदर्शक आबासाहेब होते. 1977 सालच्या नागजची पाणी परिषदेचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यावेळी विरोधी पक्षाचे नेते म्हणून आबासाहेबांनी काम केले. पाणीपरिषदेमध्ये कृष्णेचे पाणी सांगोला सारख्या दुष्काळी भागातील 13 तालुक्याला येत नाही असे सरकार म्हणत असताना कृष्णेचे उचल पाणी हे दुष्काळ भागाला मिळते व आणता येते हे आबासाहेबांनी संकल्पना मंत्रीमंडळापुढे मांडली त्यावेळी सरकारने मंजूरी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले, सध्या सरकारची स्थिती पाहता तालुक्यात शेकापची सत्ता नसताना स्व.आबासाहेबांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, जनता एकजूट व संघटित असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. पक्षाचे संघटन पाहून मला काम करण्यास प्रेरणा मिळते. गटतट विसरुन एकसंघ होवून काम करावे लागणार आहे. स्व.आबासाहेबांचे काम तेवत ठेवायचे असेल तर सर्वांनी एकसंघटन होणे गरजेचे आहे. काही मंत्रीपदाचा कालावधी सोडला तर आयुष्यभर विरोध पक्षात राहून आमदार म्हणून काम स्व.आबासाहेबांनी आदर्श कार्य केले. असे असताना सुध्दा स्व. आबासाहेबांचा विधानभवन परिसरात पुतळा होतोय याचा अभिमान माझ्यासारख्याला असून याचे सर्व श्रेय शेकापच्या कार्यकर्त्यांला व जनतेला जात असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पक्षबांधणीसाठी गावभेट दौर्याचे नियोजन आखले आहे. स्व.आबासाहेब जे करत होते ते आपणा सर्वांना यापुढे जबाबदारीने करावे लागणार आहे. गावाच्या समस्या सोडविण्यासाठी शेकाप कार्यकर्त्यांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे. एकसंघटीत होवून काम करावे लागणार आहे. एकसंघटित राहिलो नाही तर मागण्या पुर्ण करता येणार नाहीत. दीनदलित गोरगरीबांचा पक्ष शेकाप मानला जातो. पक्ष कार्यक्षम ठेवायचा असेल तर आपल्याला एकत्रित व्हावे लागेल. येणारा काळ कठिण आहे पण अशक्य नाही. सध्याचे तालुक्याचे चित्र बदलायचे असेल, सोनेरी दिवस सामान्यांची सत्ता आणायची असेल तर एकसंघटीत होवून सर्वांनाच काम करावे लागणार आहे. शेकापचा आमदार झाला पाहिजे हे आबासाहेबांचे अधुरे स्वप्न आपण बाळगले पाहिजे. हे स्वप्न आपण पाहत मतभेद विसरुन येणार्या निवडणुकीला सामोरे जावू असे सांगत सर्वांनी एकत्रित राहुन चांगल्या पध्दतीने काम करुन शेकापचा लाल बावटा फडकविल्याशिवाय सर्वजण शांत बसणार नाहीत अशीही शेवटी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ.अनिकेत देशमुख यांच्या गावभेट दौर्यामुळे शेकापमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. स्व.आबासाहेब यांच्या विचारावर, तत्वावर डॉ.अनिकेत देशमुख यांची वाटचाल सुरु असून गावभेट दौर्यामुळे स्व.आबासाहेबांचे गावभेट दौर्याचे चित्र डोळ्यासमोर दिसत असल्याचे शेकापच्या कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
स्व.आबासाहेबांच्या दृष्टीक्षेपातील सांगोला तालुका घडविण्यासाठी डॉ.अनिकेत देशमुख यांनीच लवकरात लवकर स्व.आबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन सांगोल्यातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी कायमस्वरुपी यावे अशी अपेक्षाही गावभेटीच्या दौर्यामधून सामान्य कार्यकर्ते, शेतकरी बांधव व शेकापचे कट्टर कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.