Type Here to Get Search Results !

सरकारने तातडीने पावले उचलून लम्पी आजारापासून पशुधन वाचवण्यास प्राधान्य द्यावे-डॉ.अनिकेत देशमुख




सरकारने तातडीने पावले उचलून लम्पी आजारापासून पशुधन वाचवण्यास प्राधान्य द्यावे-डॉ.अनिकेत देशमुख

तालुका प्रशासनाने जास्तीत जास्त सर्वत्र जनजागृती करावी

सांगोला (प्रतिनिधी):- सरकारने तातडीने पावले उचलून लम्पी आजारापासून पशुधन वाचवण्यास प्राधान्य द्यावे.अतिवृष्टीने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले परंतु राज्य सरकार त्यांना भरीव आर्थिक मदत देऊ शकले नाही. सरकारने जाहीर केलेली मदतही तुटपुंजी आहे. तीही अद्याप शेतकर्‍यांना मिळालेली नाही. शेतकरी जगला तरच आपण जगू, शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते म्हणून राज्य सरकारने लम्पी आजारापासून पशुधन, दुग्धव्यवसाय व शेतकरी यांना वाचवावे, अशी मागणी शेकापचे डॉ.अनिकेत देशमुख यांनी केली आहे.

यासंदर्भात डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले की, लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी तालुक्यातील प्रशासनाने जास्तीत जास्त सर्वत्र जनजागृती करावी. जनजागृतीसाठी सामाजिक माध्यमांचाही वापर करावा. लंपी आजारावर उपयुक्त असणार्‍या लस व औषधांची जास्तीत जास्त उपलब्धता करून द्यावी. तसेच लंपी स्किन आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सांगोला तालुक्यात जास्तीत जास्त खाजगी पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहकार्यातून लसीकरण मोहीम घ्यावी. 

अतिवृष्टीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरलेला नसतानाच लम्पी आजाराचे मोठे संकट त्याच्यावर ओढवलेले आहे. सांगोला तालुक्यातील काही भागातील जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. हा रोग जास्त पसरू नये यासाठी वेळीच औषधोपचार करणे व हा रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ निर्णय घेतला पाहिजे. लम्पी आजारावर आवश्यक लसीचा साठा मागवावा. लम्पी आजारावर जर वेळीच नियंत्रण मिळवता आले नाही तर पशुधनाला मोठा फटका बसून शेतकर्‍यांचेही नुकसान होऊ शकते. 

भविष्यातील धोका लक्षात घेता सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी शेवटी डॉ.अनिकेत देशमुख यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad